Press "Enter" to skip to content

दुवा

दुवा

मर्त्य मानवा तुला न कळले,
विधात्याने जे मनी योजिले.
विस्मयकारक ती दिव्यद्रुष्टी,
निर्मिताना अद्भूत जीवसृष्टी.

चल काही तर अचल काही,
अस्तित्व कुणाचे वृथा नाही.
विरोधाभासही पहावे सगळे,
शुभ्र बक अन् काळे कावळे.

नकाच हिणवू त्यास ‘एकाक्ष’,
महत्त्व यांचे सांगे पितृ पक्ष.
मृत्यूलोकिशी असे याचे सूत,
पितरांचे ईहलोकिचे हे दूत.

शिवती न ते जोवरी पिंडाला,
लागती जीव सारे टांगणीला.
निसर्ग संबोधे ‘अपमार्जक’,
होते जमात कधी अराजक.

वसे ठायी ती कुटुंबवत्सलता,
मादामादीत कर्तव्य समानता.
भावी संकटांचा मिळे इशारा,
अभ्यासता जीवनक्रम सारा.

निसर्ग साखळीतील हा दुवा,
जाणिव पूर्वक जपायला हवा.

निलिमा देशपांडे, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.