सिटी बेल लाइव्ह / टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट 🔷🔶🔷🔶
अकाउंट हॅक होणे आणि त्यावरून आपल्याला अपेक्षित नसलेल्या गोष्टी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून घडणे, हे निश्चितच काळजी आणि चिंता वाढवणारी गोष्ट ठरते. गेल्या काही वर्षात डेटा स्वस्त झाला आणि मोबाईल वापरकर्त्यांचा ईंटरनेट वापरही वाढला. इंटरनेट वापराने लोकांचे आयुष्य जितके सहज आणि सोपे झाले आहे. तितकेच त्याचा वापर करताना धोकेही वाढले असल्याचे दिसून येते. हल्ली मोबाईलचे हॅकींग होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हॅकर्स मोठ्या शिताफीने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून मोबाईल युझर्सना फसवत असल्याच्या अनेक तक्रारी वाढल्याचे दिसून येत आहे.
हॅकींग म्हणजे काय ?
हॅकींग म्हणजे अशी कृती ज्याद्वारे बेकायदेशीररित्या एखाद्या मोबाईलच्या अथवा संगणकाच्या सुरक्षा प्रणालीमध्ये प्रवेश केला जातो. वापरकर्त्याच्या कसल्याही परवानगीशिवाय आणि फसवणुकीच्या आणि शोषणाच्या उद्देशानेच हे कृत्य घडत असल्याकारणाने हा गंभीर असा गुन्हा समजला जातो.
मोबाईल हॅक कसे होतात?
मोबाईल हॅक करण्यासाठी हॅकर्स एक विशिष्ट लिंक युझर्सना पाठवतात. मालवेअर समाविष्ट असलेली ही लिंक उघडण्यासाठी हॅकर्सकडून युझर्सना फोन अथवा एसएमएस केला जातो. यापद्धतीने जाळ्यात अडकवून मोबाईलवरील संभाषण, माहिती, छायाचित्रे दूरवरून मिळवू शकतात.
हॅकर्स काय करतात?
– मोबाईलमध्ये आधीपासून असलेली माहिती बदलली जाते.
– आवश्यक ती माहिती चोरली जाते.
– मोबाईलमध्ये असणारी गोपनीय माहिती मिळवून आपल्या खात्यावरील बँकेचे ऑनलाईन व्यवहार केले जातात.
– आपले फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी वैयक्तिक ऍप्लिकेशन हॅक करून आपल्या प्रायव्हसीचा भंग करून त्याचा गैरवापर केला जातो.
– हॅकर्स आपल्या नंबरवर आलेला ओटीपी मागवून घेऊन त्याद्वारे आर्थिक फसवणूक करतात.
– आपण बँकेतून अथवा सरकारी खात्यातून बोलत असल्याचा बनाव करून त्यांना हवी ती माहिती आपल्याकडून मिळवतात.
मोबाईल हॅक झाला आहे, हे कसे ओळखावे?
– आपण न केलेली कृती झालेली असणे. उदा. एखादा मॅसेज पाठवला जाणे.
– मोबाईल मधील ऍप्लिकेशन्स आपोआप सुरु होणे किंवा बंद होणे.
– मोबाईल एकदमच बंद होणे अथवा रिस्टार्ट होणे.
हॅकिंगपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?
– कुणी फोन करून पासवर्ड अथवा ओटीपीची मागणी करत असेल तर त्याची तक्रार करा.
– मेल अथवा एस एम एसमधून आलेली अनोळखी लिंक उघडू नका.
– अनोळखी व्यक्ती अशा लिंक्स पाठवत असेल तर त्याला ब्लॉक करा.
– आपल्या फोनला पासवर्ड असू द्या.
– आपल्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक कुणालाही शेअर करू नका.






Be First to Comment