सिटी बेल लाइव्ह / भटकंती / उदय कळस 🔶🔷🔶🔷
त्रिगुणात्मय दर्शन ||
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त||
आपण २१ व्या शतकात आहोत. गेल्या द्विशतकात माणसाने विज्ञानामुळे अवकाशात वेगवेगळ्या ग्रहांवर गरुड भरारी घेतली आहे. एवढं सगळं असलं तरी ज्यावेळी माणूस एखाद्या घटनेत निराश, हतबल होतो तेव्हा तो शेवटचा पर्याय म्हणून विश्वासाने परमेश्वरापुढे हात जोडतोच. त्यावेळी मात्र त्याला परमेश्वरच सुखकर्ता वाटतो.

अशीच एक घटना. निसर्ग सर्वश्रेष्ठ असून ती चालवणारी कोणतीतरी अद्भुत शक्ती आहे याचा प्रत्यय देणारी घटना.
रायगड जिल्हा, म्हसळे तालुक्यातील निसर्गरम्य वारळ गाव. डोंगरद-यात वसलेले, चोहोबाजूंनी निसर्गाचं वरदान लाभलेलं. डोंगरातून वाहणारी कडा नावाची नदी. असं हे सुंदर ठिकाण.

सन १९७२ साली घडलेला चमत्कार. याच डोंगर दऱ्यांमध्ये दोन १०/१२ वर्षाची लहान मुलं आंबे-काजू आणण्यासाठी गेली होती. दुपारच्या वेळी नदीच्या पात्रामध्ये पाणी पिण्यासाठी गेली असताना अचानक समोर त्यांना प्रकाशझोत दिसला आणि त्या प्रकाश्यामध्ये साक्षात दत्तगुरु प्रगटलेले दिसले. हे सर्व अचानक झाल्यामुळे आणि गावात असल्येल्या दत्त मंदिरातील मूर्तीसारखी समोरील त्रिमूर्ती दिसल्यामुळे ते घाबरले आणि गोंधळून गेले आणि भीतीमुळे त्यांनी गावाकडे धूम ठोकली.
झाला प्रकार गावकऱ्याना भीत भीत कथन केला.हे सर्व ऐकून आश्चर्यचकित होऊन गावकरी सुध्दा डोंगराकडे निघाले.ज्यावेळी ते सर्व डोंगराळ भागात पोहचले.त्यावेळी त्यांना सुरुंग फुटल्याने जसा आवाज येतो तसा आवाज नदीच्या खडकाळ पात्रातून ऐकावयास मिळाला. थोड्यावेळाने आवाज शांत झाल्यानंतर गावकरी सुद्धा घाबरत पात्रामध्ये उतरले असता त्यानंतर अचंबित करणारे दृश्य नजरेस पडले.
ज्याठिकाणी सुरुंग फुटल्यासारखा आवाज येत होता.त्याठिकाणी आपोआप एका गुहेची निर्मिती झाली होती.त्या गुहेमध्ये साक्षात श्री दत्तगुरूंची मूर्ती स्वयंभूपणे स्थापित झाली होती.तसेच गुहेमध्ये पाण्यात नाग,बेडूक आणि खेकडा हे एकमेकांचे शत्रू असलेले प्राणीमात्र आनंदाने विहार करताना दिसत होते.हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो लोक येऊन गेले. तेव्हा पासून तेथे नियमितपणे श्री दत्तगुरूंची उपासना सुरू झाली.

भक्तांनो हे ठिकाण इतके सुंदर आहे की पावसाळ्यामध्ये १०० फूट कोसळणारा निर्झर आणि आजूबाजूला असलेला हिरवागार प्रदेश. अतिशय निरव शांतता असलेला हा परिसर आजूबाजूच्या परिसरात खूप प्रसिद्ध झाला आहे.

१९७२ सालापासून स्वयंभू गुरुदत्त मंडळ नावाची सेवाभावी रजिस्टर संस्था या ठिकाणी कार्यरत आहे. या संस्थेमार्फत या ठिकाणी दरवर्षी दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .त्यावेळी शैक्षणिक तसेच प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात. येथील जागेत मंदिराचे काम चालू आहे. गावकरी आपल्यापरीने प्रयत्न करून सदर मंदिराच्या कार्यास हातभार लावतात.
अशा या नयनरम्य निसर्गातील ह्या ठिकाणाला अवश्य भेट द्या आणि स्वयंभू श्रीगुरुदत्तांच्या मूर्तीचे दर्शन घ्या असे आवाहन मंडळाचे पदाधिकारी रुपेश पाटिल यांनी भाविकांना केली आहे.






Be First to Comment