निसर्गराजा गणपती – “कड्यावरचा गणपती” 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / भटकंती / अजय शिवकर 💠🌟💠🌟
माथेरान मिनी ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनने माथेरानच्या खडकांमध्ये 100फुटी विशाल गणपती साकारला.
श्रद्धा – अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न. काहींना माणसांमध्ये देव असतो. तर काही ओबडधोबड खडकांतुन मुर्ती घडवतात.
कधी घरी विकत आणलेल्या टोमॅटो किंवा नारळाचा आकार गणपतीसारखा असल्यावर हलकासा का होईना मनात आनंद निर्माण होतो.
नेरळ-माथेरान दरम्यान मिनी ट्रेनचं इंजिन चालवणा-या राजाराम खडे या माणसाला आसपासच्या कड्यांमध्ये गणपतीचा आकार भासला. भक्तिभावातुन त्यांनी साकारलेला ‘कड्यावरचा गणपती’ आज माथेरानला जाणा-या सर्व पर्यटकांचं एक आकर्षण आहे.
राजाराम खडे हे नेरळ-माथेरान दरम्यान जी मिनी ट्रेन धावते ती ट्रेन चालवणारे एक मोटरमन. १९९८ पासुन ते मिनी ट्रेन चालवत होते मिनी ट्रेन चालवताना पेब किल्ल्याजवळ एक मोठा कडा त्यांच्या नजरेस यायचा. या कड्यास ‘मिठाचा खडा’ असं नाव होतं.
या कड्याकडे पाहिल्यानंतर त्यांना त्यात गणपतीचा आकार असल्याचा भास व्हायचा. एकदा नेरळहून ट्रेन चालवताना राजाराम दादा चालवत असलेल्या इंजिनात एक उंदीर शिरला. ट्रेन मिठाच्या कड्याच्या इथे आल्यावर तो उंदीर इंजिनमधुन टुणकन उडी मारुन बाहेर पडला.
राजाराम यांना हा दैवी संकेत वाटला. त्यांनी पुन्हा त्या कड्याकडे बघितले.
निरखुन पाहिल्यावर त्या खडकांमध्ये त्यांना गणपतीचा आकार दिसला. राजाराम अस्वस्थ झाले. बेचैन झाले. त्यांना काहीतरी करावं, अशी इच्छा झाली.
राजाराम दादांनी नेरळ-माथेरानला राहणा-या स्थानिक नागरीकांना कड्यामध्ये गणपती साकारायची कल्पना सांगीतली. रेल्वेमध्ये काम करत असलेल्या सहकर्मचा-यांना सुद्धा त्यांनी विश्वासात घेऊन हे सांगीतले. सगळ्यांनी राजाराम दादांना साथ दिली आणि २००४ मध्ये राजाराम दादांसह सर्वांनी कड्यावर गणपती निर्माण करायची मोहीम हाती घेतली.
सुरुवातीला लोखंडी पत्र्याच्या साहाय्याने कड्यावरील खडकांना गणपतीच्या तोंडाचा आकार देण्यात आला. नंतर गणपतीचे हात आणि हातांमध्ये असणारी आयुधं खडकांमध्ये निर्माण केली गेली. जवळपास चौदा वर्षानंतर २०१८ साली ५२ फूट उंच असा कड्यावरचा गणपती पूर्णत्वास आला.
गणपतीच्या पायाखाली भव्य असा उंदीर सुद्धा बनवण्यात आला.
लोकांना दर्शन घेता यावं म्हणुन कड्यावरच्या गणपतीच्या पायथ्याशी छोटंसं मंदिर बनवण्यात आलं असुन भव्य अशा गणपतीच्या छोट्या प्रतिकृतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
माथेरानला निसर्गाच्या कुशीत असलेल्या या गणरायाला ‘निसर्गराजा गणपती’ हे नाव दिले गेले आहे. माथेरानजवळ असणारा पेबचा किल्ला अर्थात विकटगडला वर्षभरात असंख्य गिर्यारोहक भेट देतात. विकटगडावर जायच्या आधी गिर्यारोहक या गणपतीचं दर्शन घेऊन पुढे वाटचाल करतात.
राजाराम दादांच्या गणपतीवरील श्रद्धेने साकार झालेला हा भव्यदिव्य गणपती निसर्ग आणि मानवाने निर्माण केलेल्या कलाकृतीचं प्रतीक आहे.
राजाराम दादा आज सेवानिवृत्त झाले असले तरी कड्यावरच्या गणपतीवर रंगरंगोटी मारणं, त्याची निगा राखण्याचं काम ते स्वखर्चाने आत्मीयतेने करत असतात. लोकं जेव्हा श्रद्धेने येऊन दर्शन घेतात, तेव्हा इतकी वर्ष केलेल्या मेहनतीची पोचपावती त्यांना मिळते.
मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकावरून माथेरान ला जायला टॅक्सी मिळतात, टॅक्सी नी गेल्या वर अर्ध्या घाटात कड्यावरचा गणपती व पेब किल्ल्या कडे माथेरान ट्रेन च्या ट्रॅक वरून जातो अर्ध्या तासात आपण गणपती जवळ पोहचतो.
Be First to Comment