मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर गावातील योग्य व्यक्ती प्रशासक म्हणून नेमण्याचा राज्यपालांचा अध्यादेश ###
सिटी बेल लाइव्ह / मुंबई ###
देशामध्ये कोरोनाची साथ आल्यामुळे जून ते डिसेंबर महीन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुदत संपणाऱ्या त्या ग्रामपंचायतीवर शासनाने गावातील योग्य व्यक्ती प्रशासक म्हणून नेमावा असा अध्यादेश राज्यपालांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या गावा गावातील राजकारण कोरोनाच्या काळातही ढवळून निघणार आहे, अनेकजण आपल्याला संधी मिळावी यासाठी धडपडत आहेत.
गावातील आता अनेकांनी प्रशासक पदी वर्णी लागवी यासाठी नेत्यांना साकडं घालायला सुरूवात केली आहे. म्हणूनच सरपंच पदाच्या स्पर्धेसारखीच या प्रशासकाच्या स्पर्धेलाही बरीच रंगत येणार अशी चर्चा आता गाव पातळीवर वर्तविली जात आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक न करता गावातील योग्य व्यक्तीची निवड केली जावी, असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.या निर्णयाचा परिणाम म्हणून गावातील सर्वसामान्य नागरिकालाही आता ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. महाराष्ट्रात डिसेंबर अखेरपर्यंत १२ हजार ६६८ ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर शासनाचा प्रतिनिधी बसवणार असल्याचं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी घोषित केलं होतं. राज्याची दोन्ही सभागृहे बंद असल्यानं याबाबत आदेश निघू शकला नाही. मात्र आता राज्यपाल यांनी प्रशासकपदावर गावातील योग्य व्यक्तीची नेमणूक करण्याचा आदेश नुकताच जाहीर केला आहे.
Be First to Comment