अनिल ढवळे यांचा आदर्श वस्तुपाठ
वैयक्तिक खर्चातून केली रस्त्याची डागडुजी
सिटी बेल लाईव्ह/ शिवकर प्रतिनिधी
ओएनजीसी कॉलनीच्या प्रवेशद्वारापासून शिवकर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. शिवकर , उसर्लि, मोहो येथील ग्रामस्थांना खड्ड्यातून वाट काढावी लागत होती. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे यांनी वैयक्तिक खर्चातून या रस्त्याची डागडुजी केल्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.
ओएनजीसी कॉलनी प्रवेशद्वारापासून पुढे जाणाऱ्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी अनेक निवेदने देण्यात आली होती. कोरोना महामारी च्या वैश्विक आपत्तीमुळे संबंधित कार्यालयातून या कामासंबंधी पाठपुरावा करणे जिकरीचे होऊन गेले होते. बाप्पाचे आगमन सुद्धा खड्ड्यातूनच होणार की काय अशी भिती ग्रामस्थांना वाटू लागली होती. जनभावनांचा आदर करत सरपंच अनिल ढवळे यांनी पुढाकार घेत वैयक्तिक खर्चातून या रस्त्याची डागडुजी करून दिली. स्वखर्चाने मटेरियल आणि मशिनरी उपलब्ध करून देत स्वतः जातीने उभे राहून त्यांनी हे काम करून घेतले. त्यांच्या या धडक्यामुळे शिवकर , उसर्लि, मोहो येथील ग्रामस्थांच्या कडून समाधान व्यक्त केले जात आहे.
विकास कामे जर शासनाच्या लाल फितीच्या कारभारात अडकून पडली असतील तर ती करण्यासाठी लोकप्रतिनिधीं च्या ठायी इच्छाशक्ती असावी लागते याचा आदर्श वस्तुपाठ अनिल ढवळे यांनी घालून दिला आहे.








Be First to Comment