लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानची मागणी, पाली तहसीलदारांना दिले निवेदन 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) ✳️💠✳️💠
सुधागड तालुक्यात शासनाच्या वतीने आदिवासी सैनिकी प्रशिक्षण केंद्र (फोर्स ऍकेडमी )लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. संस्थेचे पदाधिकारी रमेश पवार यांच्या नेतृत्वात पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील दुर्गम, जंगल भाग, डोंगर दर्याखोऱ्यात, माळरान पठारावर मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती विस्तारलेली आहे. आदिवासी समाज आता शैक्षणिक दृष्ट्या देखील प्रगतीपथावर असताना येथील तरुणांसाठी शासनाच्या वतीने सैनिकी प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यास तालुक्यातील अधिकाधिक तरुणांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळेल, व त्यांचे भवितव्य घडण्यास मदत होईल. पर्यायाने समाजाची उन्नती होण्यास मदत होईल. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विशिष्ट गुणांचे (उदा. कबड्डी, धनुर्विद्या, लांब पल्ल्याचे धावणे इत्यादी) मूल्यमापन करून त्यानुसार त्यांना पोलीस, सुरक्षा रक्षक, सैनिक व अन्य प्रशासकीय नोकरीत संधी मिळेल, शासन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कायम कार्यरत आहे.
अशातच आदिवासी , मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न विद्यार्थी दशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी सैनिकी प्रशिक्षण केंद्र अत्यंत उपयुक्त ठरेल, यासाठी रायगड जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्थरावर अशाप्रकारचे प्रशिक्षण केंद्र निर्माण करावेत, अशी मागणी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी रमेश पवार, वामन वारे, कृष्णा वाघमारे, सखाराम वाघमारे, सुनिल वाघमारे, दत्ता जाधव, दगडू वाघमारे, सुनिल जाधव, गणपत वाघमारे, सुरेश वालेकर, दिनेश पवार, आदींसह आदिवासी तरुण मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानने केलेली मागणी योग्य व उपयुक्त असून सैनिकी प्रशिक्षण केंद्र निर्माणासाठी प्रशासन सकारात्मक भूमिकेत आहे. आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी प्रशासन कायम कटिबद्ध असून सदर निवेदनाच्या अनुषंगाने मागणीच्या पूर्ततेसाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल.
दिलीप रायन्नावार, पाली तहसीलदार






Be First to Comment