Press "Enter" to skip to content

कोरोना महामारीचा धोका पत्करून शिक्षणाचा ‘वसा’

सिटी बेल लाइव्ह / भिवपुरी (गणेश मते) 🔷🔶🔷🔶

कोरोना महामारीमुळे जग ठप्प आहे. मात्र, जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक विद्यार्थी घडवण्याचा घेतलेला वसा जपताना दिसत आहेत. कर्जत तालुक्यातील उकरुळ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकही मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांना अशाचप्रकारे त्यांच्या घरी जाऊन ऑफलाईन शिक्षण देत असून याबाबत त्यांचे कौतुक होत आहे.

शिक्षक हा अखिल विश्वाचा निर्माता व रचनाकार आहे, असे म्हटले जाते. समाजातील प्रत्येकाला घडवण्यात शिक्षकांचा वाटा मोठा असतो. किंबहुना विद्यार्थी शाळेत असताना शिक्षक त्याचे पालक होतात. शिक्षकाने केलेले संस्कार विद्यार्थ्यांच्या आयुष्याची शिदोरी असते. मात्र काळाच्या ओघात शिक्षण पद्धती बदलत आहे. कोरोना महामारीच्या काळातही शाळांसह खाजगी क्लासेसनी मोबाईलवर ऑनलाइन शिकवण्यावर भर दिला आहे. दरम्यान, हातावर पोट असणाऱ्या पालकांनी आपल्या पाल्याला शिकवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या मदतीला आता शिक्षकच धावून आले असून त्यांनी सोशल डिस्टसिंग ठेवत शिकवण्यास सुरुवात केली आहे.

शिक्षकभरती करून करणार काय?
सध्या बरेच जण शिक्षण खाजगी शाळेत घेतात आणि नोकरी सरकारी शाळेत हवी असते. तसेच, पालकही आपल्या पाल्याला खाजगी शाळेत घालतात. यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या एक आकडी झाल्याचे दिसते. परिणामी अनेक शाळांचे समायोजन झाल्याने शिक्षकांवर घरी बसायची वेळ आली आहे. एकीकडे पाल्याला खाजगी शाळेत टाकायचे आणि दुसरीकडे सरकारी शाळांमध्ये भरती निघत नाही म्हणून काहीजण ओरडताना दिसतात. जर विद्यार्थीच नसतील तर सरकार भरती करून करणार काय, असे मत एका शिक्षकाने मांडले. जर जिल्हा परिषद शाळांची अशी भीषण अवस्था असेल तर सरकारी नोकऱ्या मिळतील का, असा प्रश्न पडतो.

मोबाईल नसल्याने अभ्यास करायचा कसा ?
कोरोना महामारीमुळे शिक्षण आणि शिक्षकांची अशी बिकट अवस्था असूनही ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. मात्र ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उकरूळ शाळेतील शिक्षकांचे कौतुकास्पद कार्य
कर्जत तालुक्यातील चिंचवली केंद्र असलेल्या उकरुळ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मोबाईल उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्याना ऑनलाइन शिकवत आहेत. सदर मोबाईलवर शिकवतानाचे व्हिडीओ पाठवतात. तसेच, ‘दिक्षा’ अॅपचा वापर करुन रोजचा अभ्यास घेतला जातो. तर आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी घरी जाऊन सोशल डिस्टनसिंग राखत शिकवण्याचे कार्य करीत आहेत. तसेच ज्यांच्याकडे टिव्ही आहे त्यांना टिलिमिली हा कार्यक्रम पाहण्यास सांगून किती समजले ते पाहिले जाते. त्याच्या या कामाचे सामान्य पालकांकडून कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.