Press "Enter" to skip to content

नागरीकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे : कर्जत नगरपरिषदेचे आवाहन

सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷


कोरोना विषाणू ने हाहाकार माजवला आहे, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत गणेशाचे उद्या दि.22 ऑगस्ट रोजी आगमन होणार आहे, हा सण दरवर्षी आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो मात्र या वर्षी या सणाला कोरोना चे सावट आहे, त्यामुळे शासनाने हा सण साजरा करताना काही नियमाचे पालन करण्याच्या आदेश दिले आहेत या आदेशाचे सर्वानी पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला असून शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी महाराष्ट्र कोव्हीड- 19 उपाय योजना नियम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिपत्रव्दारे काढण्यात आली आहे.

कोव्हीड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेता आगामी गणेशोत्सव दरम्यान काही सूचनांचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित कार्यालयांना देण्यात आले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी शक्यतोवर यावर्षी सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे टाळावे, सार्वजनिक गणेश गणपतीची प्रतिष्ठापना केल्यास संबंधित तालुक्याचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडून आवश्यक ती पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील, कोव्हीड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच माननीय न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपा बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत, यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात कोणतेही भपकेबाजी नसावी.

श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरीता चार फूट, घरगुती गणपती दोन फुटाचा मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी, यावर्षी शक्यतो गणेशोत्सव कमीत कमी दिवस साजरा करावा तसेच पारंपारिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातु संगमरवरी आदी मूर्तींचे पूजन करावे मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे.

सांस्कृतिक गर्दीच्या कार्यक्रमांत ऐवजी सामाजिक अंतर राखून आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे, रक्तदान, वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे, त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंगू आदी आजार आणि त्याचे प्रतिबंधक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, आरती भजन कीर्तन अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनीप्रदूषण संदर्भातील नियमांचे व संस्कृतीचे पालन करण्यात यावे.

गणेशोत्सवा दरम्यान घरगुती गणपतीच्या दर्शनासाठी गृहभेटी देणे टाळावे व अनुषंगाने तीर्थ प्रसादासाठी महाप्रसादाचा उपस्थित टाळावी, श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात प्रत्येक सार्वजनिक स्थळी विसर्जन करण्यासाठी गर्दी करू नये, विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जन कधी होणारी आरती घरी करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबा, लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे, संपूर्ण चाळीतील इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित रीत्या काढण्यात येऊ नयेत,विसर्जनासाठी प्रत्येकाने वैयक्तिक न जाता कॉलनी, आळीतले गणपती हात गाडी, ट्रक, टेम्पो मध्ये ठेवून सर्व गणपतीचे फक्त दोन ते तीन व्यक्ती द्वारे विसर्जन करावे.

मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद आदी कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीला टाळण्याकरीता पूर्णतः मनाई करण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परिपत्रका व्दारे काढले आहेत या आदेशाचे पालन करावे असे आवाहन नगरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.