सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) :
शिवसेना उरण तालुका व शहर यांच्या वतीने उरण नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उचित कार्यवाही करणेबाबत उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने उरण शहरातील रस्त्यांची कामे सुरु झाल्यापासून एनएमएमटी बंद करून ती पेन्शनर्स पार्क येथून उरण चारफाटा येथे हलविण्यात आली आहे. यामुळे उरण शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी रस्त्याची कामे पूर्ण झाल्यामुळे सदर एनएमएमटी सेवा पूर्ववत पेन्शनर्स पार्क येथे सुरु करण्यात यावी. अन्यथा चारफाटा येथे प्रवाशी व चालक यांना बसण्यासाठी शेड उभारण्यात यावी. वैष्णवी हॉटेल लगत असणाऱ्या नाल्यावरती केलेले बांधकाम हे रस्त्यामध्ये येत असून सर्वसामान्य जनतेस रहदारीस व वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. तेथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे व भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर बांधकामावर उचित कारवाई करून सदर रस्त्यात आलेले बांधकाम तोडण्यात यावे.
जागोजागी अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. वेळीच उरण शहर रोजच्या रोज स्वच्छ होण्याकरिता आपणाकडून संबधित विभागाला आदेश व्हावेत.रस्त्याचे उर्वरित कॉक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यावे आणि उरण शहरात ज्या ज्या ठिकाणी रस्त्यात पडलेले खड्डे व निघालेले पेव्हर ब्लॉक ही गणेशोत्सवापूर्वी त्याची डागडुजी करून खड्डे भरून नवीन पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावे.
उरण शहरात जे नगरपालिकेमार्फत उभारलेले पाथदिवे (स्ट्रीट लाईट) काही निकामी झालेले आहेत ते गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पूर्ववत कराव्यात. तसेच उरण नगरपरिषदेच्या सर्वच ठिकाणी पाणी कमी दाबाने येत असून, तरी त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी संतोष माळी यांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी दिले.
यावेळी सोबत उ.न.प. शिवसेना गटनेते गणेश शिंदे, उपशहरप्रमुख गणेश पाटील, नगरसेवक अतुल ठाकूर, नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेविका विद्या म्हात्रे, युवासेना अधिकारी नयन भोईर, डॉमनिक कोळी व शहर शाखेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.






Be First to Comment