Press "Enter" to skip to content

नागावकर परिवाराने जपली आहे गणपती व्यवसायाची परंपरा


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) :

रोहे तालुक्यातील धार्मिक तथा अध्यात्मिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी या गावातील नागावकर परिवाराने पिढ्यानपिढ्या आपली गणपती व्यवसायाची परंपरा जतन करून ठेवली आहे. आज या व्यवसायात त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे.

या परिवारातील स्व.कोंडाजी नागावकर हे उत्तम मूर्तीकार,चित्रकार म्हणून नावारुपास आर्ले होते.त्यांनी त्यावेळी आपल्या हयातीत तालुक्यास जिल्ह्यातील विविध गावात स्वतःच्या हाताने बनविलेल्या पाषाणाच्या मूर्ती आजही काही गावामध्ये पहावयास मिळत आहेत.तर ते उत्तम चित्रकारही होते.त्यांनी आपल्या कलेला जोड म्हणून गणपतीच्या मातीच्या मूर्ती हाताने बनविण्यास प्रारंभ केला.

उत्तम कोरीवकाम, आकर्षकपणा,उत्तम नक्षीकाम व रंगकाम यामुळें मूर्तीमध्ये जीवंतपणा आणण्याची त्यांची कला पाहून त्यांचा व्यवसाय हळूहळू वाढू लागल्याने तालुक्यातील विविध भागातून त्यांच्या गणेश मूर्तींना मागणी येऊ लागली. पुढे हिच कला त्यांच्या पुढील पिढीतील स्व.ह.भ.प.परशुराम नागावकर स्व.ह.भ.प.तुकाराम नागावकर, ह.भ.प.यशवंत नागावकर, ह.भ.प.रामकृष्ण नागावकर, ह.भ.प.चंद्रकांत नागावकर यांनी टिकून ठेवली.तर स्व.ह.भ.प.कोंडाजी नागावकर यांचे सारेच कौशल्य त्यांनी अंगी बाणवून अगदी कठिण परिस्थितीत आपल्या पिढीचा पिढीजात व्यवसाय टिकवून ठेवला.आजच्या परिस्थितीत त्यांची चौथी पिढी ही या व्यवसायात आहे.

नागावकर परिवारांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींना केवल रोहे तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात मोठी मागणी असते.तसेच अगदी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथेही त्यांच्या मूर्ती आजही नेल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे. दिवसेंदिवस या व्यवसायातही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. परंतू नागावकर परिवाराने व्यवसाय म्हणून नव्हे तर आपला व्यवसाय पिढीजात कला म्हणून स्विकारून जतन करून ठेवला आहे.त्यांच्या व्यवसायाला पूर्वीपेक्षाही मागणी वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच गणेशमूर्ती घडविण्याचे त्यांचे काम चालू असते ते अगदी शेवटपर्यंत सारा परिवार तहानभुक विसरून मग्न झालेले पहावयास मिळतात.तर जास्तीत जास्त पर्यावरणपुरक गणेश मूर्ती बनविण्याकडे नागावकर परिवाराचा कल असल्याचे दिसून येते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.