सुधागडात बेग कन्स्ट्रक्शन व ठेकेदारांची थकबाकी प्रकरण चिघळले : कंपनीने थकीत 3 कोटी रुपये दिले नाहीत, तर एस. बी. पालरेचा कंपनीचे मालक प्रकाश पालरेचा करणार आत्महत्या…!
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम बेग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कंपनीकडे आहे. या रुंदीकरणासाठीची कामे स्थानिक ठेकेदार, सब ठेकेदारांना बेग कंपनीने दिली आहेत. सद्यस्थितीत बेग कन्स्ट्रक्शन व स्थानिक ठेकेदार प्रकरण आता चिघळल्याचे दिसून येत आहे.

पालीतील एस. बी. पालरेचा कन्स्ट्रक्शन कंपनीला देखील काम देण्यात आले होते. मात्र या कामाचे तब्बल 3 कोटी रुपये बेग कंपनीने थकविले असल्याने ठेकेदार प्रकाश पालरेचा यांनी 8 दिवसांत कंपनीने थकीत पैसे दिले नाहीत तर आत्महत्येचा इशारा दिला आहे. तसेच पालरेचा यांना पाठींबा देत इतर सर्व ठेकेदारांनी देखील आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवपूर्वी ठेकेदारांची थकबाकी दिली जाईल असे संबंधित कंपनी ने आश्वासीत केले होते. मात्र अनेकदा संपर्क करून देखील सातत्याने केवळ वेळकाढूपणा ची भूमिका घेतल्याचा आरोप ठेकेदारांनी केला.
सर्व ठेकदारांनी सोमवारी (दि.17) सायंकाळी कामाचे बाकी असलेले पैसे न दिल्याने थकबाकी मिळेपर्यंत पर्याय म्हणून अखेर रस्त्याच्या कामासाठी असणाऱ्या यंत्रसामग्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या परवानगीने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. यावेळी पोलिसांच्या समक्ष आमच्यावर कुणाचाही कसलाही दबाव नाही, आम्ही स्वाक्षरी देऊन सर्वांसमक्ष मशनरी ठेकेदारांच्या ताब्यात देत असल्याचे कबूल केले होते. स्थानिक ठेकेदार प्रकाश पालरेचा यांनी कंपनीच्या सांगण्यावरून ताबडतोब पाली खोपोली रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले होते. या कामातील तब्बल 3 कोटीची देयके बेग कंपनीकडे थकीत आहेत.

एमएसआरडीसी ने बेग कंपनीला पैसे दिले असूनही कंपनी ठेकेदारांचे पैसे देत नाही आहे. त्यामुळे प्रकाश पालरेचा पुरते हवालदिल झाले आहेत. अखेर त्यांनी आत्महत्येचा इशारा कंपनीला दिला आहे. मागील महिन्यात पाली पोलीस स्थानकात त्यांनी पैसे मिळाले नाहीतर जीवाचे बरेवाईट करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला आहे असे पालरेचा यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाबाबत बेग कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राकेश खुल्लर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
बेग कंपनीने पैसे थकविल्याने माझे व इतर ठेकेदारांचे खूप नुकसान झाले आहे. खूप मोठी रक्कम अडकून पडली आहे. मला देखील मटेरिअलचे पैसे, कामगार पगार व इतरांचे पैसे देणे बाकी आहेत. या स्थितीत कंपनी कोणत्याही चर्चेला न बसता फक्त वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. त्यामुळे पुढील 8 दिवसांत थकीत देयके दिली नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईन.
प्रकाश पालरेचा, ठेकेदार
बेग कन्स्ट्रक्शन कंपनीने आपल्या सोबत काम करणाऱ्या सर्वच ठेकेदारांचे पैसे थकविले आहेत. त्यामुळे 8 दिवसांत कंपनीने पैसे दिले नाही तर प्रकाश पालरेचा यांच्यासह इतर सर्व ठेकेदार सामूहिक आत्महत्या करतील.
मनीष खवळे, ठेकेदार, वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग






Be First to Comment