सहकारी बँका वाचवण्याची शरद पवारांची मोदींकडे मागणी
पत्र लिहून व्यक्त केली चिंता
सहकारी बँकांमध्येच घोटाळे होतात असं गृहित धरणं चुकीचं
शरद पवार.
सिटी बेल लाईव्ह/ मुंबई
सहकारी बँकांमधील केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या बँकांचे अस्तित्व व ओळख टिकायलाच हवी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी संबोधित करताना मध्यमवर्गीयांच्या हितांच्या संरक्षणासाठी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणल्याचं सांगितलं होतं. या निर्णयाचं पवार यांनी स्वागत केलं आहे. मात्र सहकारी बँकांच्या कामकाजावरील रिझर्व्ह बँकेच्या वाढत्या प्रभावाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मात्र, केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टिकोन अस्पृश्यतेचा आहे. निव्वळ व्यावसायिकता व नफा हाच सहकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्य नाही. सहकारी बँका या प्रतिकूल परिस्थितीत स्वतः च्या हिंमतीवर आज टिकून आहेत. त्यामुळे आपण स्वतः या प्रश्नात लक्ष घालून या क्षेत्राला न्याय द्यावा, अशी विनंती शरद पवार यांनी केली आहे.
सहकारी बँकांमध्येच घोटाळे होतात असं गृहित धरणं चुकीचं आहे असा मुद्दा देखील त्यांनी या पत्रात मांडला.
बँकांना आर्थिक शिस्त लावली पाहिजे यात दुमत नाही. मात्र, सर्वच सहकारी बँकांचे खासगीकरण करून घोटाळे, अनियमितता व फसवणूक थांबेल असा समज करून घेणं चुकीचं असल्याचे सांगत पवार यांनी आजवर झालेली बँकांतील आर्थिक घोटाळय़ांची आकडेवारीच पत्रात दिली आहे. यामध्ये सार्वजनिक, खासगी, विदेशी क्षेत्रातील बँका वरच्या क्रमांकावर आहेत. तर सहकारी बँका शेवटच्या क्रमांकावर असल्याचे निदर्शनास आणून देत सहकारी बँकांमध्येच घोटाळे होतात असं गृहित धरणं चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं आहे.






Be First to Comment