सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) :
उरण तालुक्यात व शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तावर त्वरित उपचार करण्यासाठी उरणमध्ये कोविड हॉस्पिटल उभारण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून सुरू आहे. परंतु उरणमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू व्हावे यासाठी जो उत्साह होता आता तो मावळत जाऊन कोविड हॉस्पिटलचे घोंगडे भिजत राहिले आहे.
गेले ३ ते ४ महिन्यापासून राज्यासह उरणपरिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी उरणमध्ये अद्ययावत यंत्रणा नसल्याने रुग्णांना पनवेल, वाशी व मुंबई या ठिकाणी हलवावे लागत होते. या धावपळीमुळे काही रुग्णांचे हाल होऊन त्यांचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
उरणमधील कोरोना रुगणांना त्वरित या ठिकाणीच उपचार मिळावे यासाठी उरणमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी शासकीय यंत्रणा, डॉक्टर मंडळी, सामाजिक संघटना व काही हितचिंतकांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. त्यामुळे उरणकरांचे कोविड हॉस्पिटलचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असे वाटत होते. उरणकर कोविड हॉस्पिटल सुरू होण्याची वाट पहात आहे.
आता काही दिवसांवर गणेशोत्सव, नवरात्र, दसरा व दिवाळी सारखे महत्वाचे सण एकामागोमाग येणार आहेत. त्यापूर्वी जर कोरोना हॉस्पिटलची उभारणी केली नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून उपचाराअभावी जर बळींचा आकडा वाढत गेला तर त्याची सर्वस्वी जबादारी प्रशासन यंत्रणेचीच राहील अशी चर्चा उरणच्या नागरिकांत सुरू आहे.
कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी सुरुवातीला जोरदार प्रयत्न झाले होते. त्यानंतर आज जवळ जवळ महिना होण्यास येऊनही कोविड हॉस्पिटल उरणमध्ये सुरू करण्याच्या हालचाली मंदावल्या असल्याचे दिसून येते. तसेच याबाबत आता कोणी पाठपुरावा करताना दिसत नाही. त्यामुळे उरणकरांचे कोविड हॉस्पिटलचे भिजत असलेले घोंगडे कधी पूर्णत्वास जाईल याकडे उरणकरांचे लक्ष लागले आहे. अन्यथा कोरोना रुगणांना उपचारासाठी पनवेल, वाशी व मुबंई या ठिकाणी नेण्याशिवाय पर्याय असणार नाही.






Be First to Comment