सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) :
गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्यावर काही प्रमाणात बंधने लादली आहेत. त्यामुळे यावर्षी घरगुती सजावट करण्यावर भर देत यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. बाजारात सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत.
गणपती बाप्पाच्या आगमनाची महिनाभर आधीपासूनच तयारी सुरू होते. यंदा मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून सर्व सण साजरे करण्यावर बंधने आली होती. मात्र काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सव साजरा करण्यावरही मर्यादा आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी सरकारने नियमावली जाहीर केली असून त्यानुसार घरगुती २ तर सार्वजनिक ४ फूट उंचीच्या गणेशमूर्तीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध प्रकारची मिठाई बाजारात पहायला मिळत आहे. लाडू, मोदक, पेढे या सारख्या मिठाई खरेदीसाठी ग्राहक पसंदी देत आहेत. गणरायाच्या विविध रंगाच्या व आकाराच्या आकर्षक मूर्ती बाजारात आल्या आहेत. गणेश चतुर्थी दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेकजण अगोदरच गणेश मूर्ती घरी घेऊन जात आहेत.

दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र गेल्या ६ महिन्यापासून देशात व जगभरात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. दिवसेंदिवस देशात व राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत लक्षणीय वाढ पहायला मिळत आहे. त्यामुळेच गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यावर भर देण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तसेच मिरवणूक आणि एकत्र येण्यासंदर्भात बंधने घातली आहेत. त्यामुळे सार्वजनिकसह घरगुती गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्यावर भर दिला जाणार आहे.

गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. यामुळे बाजारपेठ सजावट संबंधी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सजावटीसाठी लागणाऱ्या विविध रंगाची फुले, पताका, शेला, रंगीबेरंगी माळा, फेटा, बाप्पासाठी लागणारे मंदिर तसेच विविध लायटिंगच्या माळा यासारख्या नामाविध वस्तू बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्त बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहेत.






Be First to Comment