सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #
मागील काळात २०१३ मध्ये एमएमआरडीए मार्फत जवळपास १२३ कोटी रुपयांचा भरीव निधी माथेरानच्या विकास कामांसाठी उपलब्ध झाला होता त्याची प्रत्यक्षात कामे यावेळी सुरू करण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी पुन्हा प्राप्त होणे ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे होत असलेली कामे सुयोग्य पध्दतीने निदान वीस,पंचवीस वर्षे तरी टिकतील अशा स्वरूपाची असावीत त्याचप्रमाणे पर्यावरण पूरक विकास कामे करताना रहदारीला अडथळा नको.जो पूर्वापार रहदारीचा मुळ रस्ता आहे तो सुध्दा कमी करून केवळ काळ्या दगडात ग्याबियन वॉल बांधण्याच्या नावाखाली रस्ते अरुंद केले जात आहेत. सुरक्षेसाठी जरूर नियमाप्रमाणे या वॉल पूर्ण कराव्यात परंतु होत असणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे आगामी काळात घोडेस्वार तसेच श्रमिक हातरीक्षाचालकांची त्रेधातिरपीट होऊ नये यासाठी जबाबदार लोकप्रतिनिधीनी आपले लक्ष या विकास कामावर केंद्रित करून खऱ्या अर्थाने विकासास हातभार लावावा अशी श्रमिक हातरिक्षा संघटनेसह स्थानिकांकडून मागणी केली जात आहे.
आजही अमन लॉज स्टेशन जवळील काळोखी हा सर्वात अवघड चढ कमी करण्यात आलेला नाही. त्यामुळेच जी युवा मंडळी हातगाडीवर कामे करीत आहेत त्यांना ही अतिकष्टदायक कामे करताना खूपच जिकिरीचे बनले आहे. परंतु लॉक डाऊन मध्ये हाताला रोजगार उपलब्ध नसल्याने ही युवा पिढी नाईलाजाने कुटुंबाला आधार देण्यासाठी रक्ताचे पाणी करून आपले संघर्षमय जीवन जगत आहेत.
एमएमआरडीए मार्फत होणाऱ्या विकास कामांवर जबाबदार लोकप्रतिनिधीनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. एकीकडे पर्यावरण पूरक कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असा आव आणला जातो. लवकरच इथे ई रिक्षा कार्यान्वित होणार आहे त्यामुळे ही रिक्षा अति चढावावर चालू शकत नाही. काळोखीचा चढ खूपच उंच आहे त्याची उंची कमी केल्याशिवाय श्रमिक हातरीक्षा चालकांना सुध्दा आपला व्यवसाय अगदी सहजपणे करता येणार नाही.
ज्यावेळी होत असलेल्या तकलादू कामांच्या बाबतीत इत्यंभूत माहिती जनतेसमोर मीडियाच्या माध्यमातून आणली जाते त्यावेळेस जणू एमएमआरडीएच्या काही प्रमाणात तकलादू कामांची बाजू मांडण्यासाठी येथील काही अभ्यासू मंडळीनी वकीलपत्र घेतल्याप्रमाणे सोशल मीडियावर सारवासारव करीत आहेत ,तर आम्ही चांगल्या दर्जाचे काम पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध आहोत, आम्ही पत्रव्यवहार केला आहे असे नेहमीच सोशल मीडियावर जबाबदार व्यक्तींकडून पहावयास मिळते.
या रस्त्त्याच्या चढाची तीव्रता कमी करावी यासाठी २०१० पासुन एमएमआरडीएच्या अभियंत्यांबरोबर पाठपुरावा करत होतो. त्यासाठी एस्टीमेटमधे बदल करायला आम्ही भाग पाडले. अमनलाॅज रेल्वेरुळ ओलांडल्यावर माथेरानकडे जाणार्या रस्त्याला जो उतार होता त्याचे रुपांतर भरणी करुन चढामधे करावे व हा चढ सखाराम तुकाराम पाॅईंटच्या अगोदर शंभर मीटरवर मिळवावा जेणेकरुन यामार्गावरील ज्या अवघड वळणावर तीव्र चढ आहे ज्यामुळे हातरिक्षाचालकांना व माल वाहतुकीच्या हातगाडी ओढणार्या माणसांचे हाल कमी होतील. आणि त्यांचे कष्ट बर्यापैकी कमी होतील. तसेच जे पर्यटक रस्त्याने चालत माथेरान शहरात जातात त्यांचाही प्रवास सुखकर होईल. जर या वळणावरील चढाची तीव्रता कमी झाली नाही तर पंचेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाचे मोल काय? जर एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी याबाबत सकारात्मक पाऊल उचलले नाही तर वरीष्ठांकडे सर्व कामांच्या चौकशीची मागणी करु. न्याय नाही मिळाला तर आंदोलन उभारले जाईल.
मनोज खेडकर –माजी नगराध्यक्ष माथेरान






Be First to Comment