सिटी बेल लाइव्ह / मुंबई #
ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगितकार पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. सध्या न्यूजर्सी येथे असलेल्या पंडीत जसराज यांना काल रात्री थोडा त्रास होत होता. त्यांच्या शिष्यांनी रुग्णालयात दाखल करण्या संदर्भात विचारले असता त्यांनी नकार दिला. आज, सकाळी उठल्यानंतर त्यांनी तीन वेळा दीर्घ श्वास घेतला आणि प्राण सोडले अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला. जसराज हे गेल्या 80 वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. संगीत क्षेत्रातील अनेक प्रमुख पुरस्कार त्यांना मिळाले होते.मेवाती घराण्याशी संबंध असलेल्या पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय गायन क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.
पंडित जसराज यांच्या नावाचा ग्रह
शास्त्रीय गायनाने जगावर छाप पाडणाऱ्या पंडित जसराज यांच्या नावाने एक ग्रहसुद्धा अंतराळात आहे. आंतरराष्ट्रीय खगोल संघाने मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये असलेल्या एका ग्रहाचे नाव पंडित जसराज असं ठेवलं आहे. असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार आहेत. मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मधे असलेला हा लहानसा ग्रह 2006 व्हीपी 32 (नंबर - 300128) असा आहे. याचा शोध 11 नोव्हेंबर 2006 ला लागला होता. मंगळ आणि गुरु ग्रहाच्या कक्षेच्या मध्ये असलेल्या या प्लॅनेटला पूर्ण ग्रह किंवा धूमकेत असं म्हणता येत नाही.
पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार
- पद्मश्री – 1975
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार – 1987
- पद्म भूषण – 1990
- पद्म विभूषण – 2000
- पु. लं. देशपांडे जीवनगौरव पुरस्कार – 2012
- भारत रत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार – 2013
- गंगुबाई हनगल जीवनगौरव पुरस्कार – 2016






Be First to Comment