Press "Enter" to skip to content

सालाबादप्रमाणे याहीवर्षी रोहे-कोलाड मार्ग झाला खड्डेमय


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे,(नंदकुमार मरवडे) ###


सालाबादप्रमाणे याही वर्षी रोहे-कोलाड मार्ग पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्डेमय झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असल्याने या मार्गाचे दरवर्षी पक्के डांबरीकरण करणे आवश्यक आहे.परंतू संबंधित खात्याकडून या मार्गाचे पक्के डांबरीकरण न करता उन्हाळ्यात फक्त खड्डे बुजवून तात्पुरत्या स्वरूपात मलमपटृटी केली जाते.त्यामुळे पहिल्याच पावसात हा मार्ग दरवर्षी पावसाळ्यात उखडला जातो.या वर्षीच्या पावसाळी हंगामात जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही.त्यामुळे हा मार्ग जेमतेम तग धरून होता.परंतू जुलै महिन्याच्या सुरुवातीला पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत.या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या मार्गावर धाटाव औद्योगिक वसाहत असल्याने अवजड वाहनांची सर्रास ते जा चालू असते.याशिवाय प्रवासी तसेच खाजगी वाहनेही मोठ्या संख्येने धावत असतात.११ किमी लांबीच्या या मार्गावरील काही ठिकाणचा भाग सोडला तर जवळजवळ सर्वच मार्ग हा खड्डेमय झाल्याने रात्री अपरात्री लहान मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गत वर्षीही पावसाळ्यात या मार्गावरून खड्ड्यातूनच प्रवास करावा लागल्याने निदान या वर्षी तरी उन्हाळ्यात पक्के डांबरीकरण होईल असे वाहनचालक व प्रवासीवर्गाला वाटले होते.परंतू पक्क्या डांबरीकरणाचे पाहिलेले स्वप हे स्वप्नच राहिले आहे.अद्याप पावसाळ्याचे दोन तीन महिने बाकी आहेत.त्यावेळी या मार्गाची अवस्था अतिशय भयावह असेल असे बोलले जात आहे.


आताच या मार्गाची भयानक अवस्था पाहता पुढील दिवसात या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मोठे जिकिरीचे होणार असल्याने त्याचा नाहक मनस्ताप आम्हां दैनंदिन प्रवासीवर्ग व वाहनचालक यांना सोसावा लागणार आहे.
……एक प्रवासी…..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.