Press "Enter" to skip to content

पॉस्को सोसायटीची स्थापना

कळंबोली स्टील मार्केट मधील प्लॉट धारकांच्या समस्या निवारण्यासाठी करणार प्रयत्न

पॉस्को सोसायटी प्लॉट धारकांवरील अन्याय दूर करेल
– अध्यक्ष भरत कनकिया

जास्तीत जास्त प्लॉट धारकांनी सोसायटीमध्ये सहभागी व्हावे
– सचिव महेंद्र आवटे

सिटी बेल ∆ कळंबोली ∆

कळंबोली मधील लोखंड व पोलाद बाजारातील प्लॉट धारक व्यापारी यांना कुणीही वाली नसल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. कुणीही यावे आणि टपली मारून जावे अशी त्या बिचाऱ्यांची परिस्थिती झाली होती. अनेक अस्थापनांना सेवाशुल्क,कर,वर्गणी देऊन सुद्धा त्यांच्या पदरात “शून्य” सेवा सुविधा पडत असत. प्लॉट धारकांना त्यांचे न्याय अधिकार मिळवून देण्याच्या उद्देशाने प्लॉट ओनर्सच्या हक्काची असणारी पॉस्को सोसायटीची निर्मिती करण्यात आली आहे.पॉस्को सोसायटी हे लघुनाम असून संघटनेचे पूर्ण नाव प्लॉट ओनर्स सेवा को ऑपरेटिव्ह सोसायटी असे असून शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी या सोसायटीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

पॉस्को सोसायटीच्या चेअरमन पदी भरत विनोदराय कनकिया यांची सर्वानुमते नियुक्ती झालेली असून सचिव पदी महेंद्र आवटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.तर अश्विन भाई ठक्कर हे खजिनदार असणार आहेत. सोसायटीच्या स्थापनेनंतर प्रथम कार्यकारिणीचा एक वर्षाचा कार्यकाल असणार आहे. विद्यमान कार्यकारणी मध्ये १३ पदाधिकारी असणार आहेत पैकी पाच पदाधिकारी राखीव असून त्यात दोन पदे महिलांसाठी आरक्षित आहेत. सहनिबंधक सहकारी संस्था पनवेल यांचे मुख्य लिपिक विजय सडके यांच्या देखरेखीखाली सोसायटीच्या पहिल्या कार्यकारिणीची निवड संपन्न झाली.

१९८२ साली कुर्ला येथील दारूखाना घाऊक लोखंड बाजार कळंबोली स्टील मार्केटमध्ये वसवण्यात आला. त्यानंतरच १०८६१ वर्ग मी. क्षेत्रामध्ये १९५० प्लॉट वर व्यापारी व्यवसाय करत आहेत.४० वर्षांपासून या प्लॉट धारकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. रस्ते,पाणी, स्वच्छतागृह, सुरक्षा अशा पायाभूत सुविधांची या ठिकाणी वानवा आहे. असे असले तरी येथील व्यापाऱ्यांना पूर्वी सिडको आणि आता महानगरपालिका, मुंबई महानगर प्राधिकरण लोखंड व पोलाद बाजार समिती अशा सगळ्यांनाच सेवाशुल्क आणि कर भरावा लागत आहे. वारे माप पैसा देऊन सुद्धा व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारची सेवा सुविधा मिळत नव्हत्या. व्यापाऱ्यांच्या अनेक संघटना असून देखील त्यांना न्याय देऊ शकेल अशी कुठलीही पालकत्व घेणारी संघटना या ठिकाणी अस्तित्वात नव्हती. म्हणूनच व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेऊन पॉस्को सोसायटीची स्थापना केली आहे.

सिडको हद्दीमध्ये स्टील मार्केट असल्यामुळे गेली कित्येक वर्ष प्लॉट धारकांनी सिडकोला सेवा शुल्क भरलेले आहे. पनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाल्यानंतर पायाभूत सेवा सुविधा पुरविण्याचे काम सिडको ने पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आलेले आहे. असे असले तरी देखील पनवेल महानगरपालिका पूर्वलक्षी प्रभावाने स्थापनेपासूनचा मालमत्ता कर येथील प्लॉट धारकांच्या माथ्यावरती मारत आहे. दुहेरी कराच्या जाचक वसुली विरोधात सर्वोच्च न्यायालयात लढत असलेले परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी पॉस्को सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.दुहेरी करामुळे हैराण झालेल्या प्लॉट धारकांच्या पाठीशी मी उभा राहणार असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची भूमिका यावेळी महादेव वाघमारे यांनी बोलून दाखवली.

चेअरमन भरत कनकिया यांनी आपल्या भावना प्रकट करताना सांगितले की त्यांच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र येण्याकरता यापूर्वी देखील आम्ही सोसायटीची स्थापना केली होती. परंतु काही असंतुष्ट व्यक्तिमत्त्वांनी थेट पुण्याहून वकिली फौजा भागवत आम्हाला संघटित होण्यापासून रोखले. मागील कटू अनुभवातून शिकत आम्ही पुनश्च सोसायटीची स्थापना केली आहे. खरे तर प्लॉट धारकांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे संघटित होणे ही काळाची गरज आहे. केवळ आणि केवळ प्लॉट धारकांना त्यांचे अधिकार मिळवून देणे एवढेच प्रामाणिक उद्दिष्ट आमच्या सोसायटीच्या डोळ्यापुढे असेल. तर यावेळी सचिव महेंद्र आवटे यांनी मार्केट क्षेत्रातील जवळ पास १९५० प्लॉट धारकांना सोसायटीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. गेली ४० वर्षे प्लॉट धारक त्यांच्या हक्काच्या संघटनेच्या प्रतीक्षेत होते.पॉस्को सोसायटीच्या निर्मितीमुळे त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये स्टील मार्केट मधले प्लॉट धारक मार्केट कमिटी ला प्रति वर्ग मीटर दराने कर भरत आहेत. या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट च्या नावाखाली प्रति वर्ग मिटर रक्कम भरून प्लॉट धारकांना स्वतःच्याच विकासासाठी स्वतः पैसे काढावे लागत आहेत. सिडको विकसित क्षेत्रामध्ये हे मार्केट येत असल्या कारणामुळे तुटपुंजा का होईना परंतु सेवा सुविधा देण्यासाठी प्लॉट धारकांनी सिडकोला सेवा शुल्क भरलेले आहे. आणि आता कुठल्याही स्वरूपाची सुविधा न देता गेल्या पाच वर्षाचा मालमत्ता कर घेण्यास वसुलीसाठी पनवेल महानगरपालिका उभी आहे. या सर्व जाचातून व्यापाऱ्यांना मुक्त करण्याचे उद्दिष्ट संघटनेने डोळ्यापुढे ठेवले आहे.


पॉस्को सोसायटीची पहिली कार्यकारिणी
भरत कनकिया – चेअरमन
महेंद्र आवटे – सचिव
अश्विनी भाई ठक्कर – खजिनदार
मंजू संजय गोयल – सदस्य
अनिला मालपाणी सदस्य
खालिद फिरोझ खान सदस्य
भगवान ढाकणे सदस्य
शांतीलाल शहा सदस्य
चिंतन मेहता सदस्य
नरसीराम चौधरी सदस्य
सचिन पुज सदस्य
नरेंद्र शहा सदस्य
मेहनुद्दीन भाई सदस्य

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.