पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट सानुग्रह अनुदान म्हणून मिळणार दोन महीन्यांचा पगार
सिटी बेल ∆ पनवेल ∆
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच मार्केट यार्ड म्हणून सुपरीचीत असलेल्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीसाठी पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे दोन महिन्यांचे वेतन बोनस म्हणून मिळणार असल्याने समाधानाचे वातावरण असल्याचे चित्र दिसते आहे. आमच्या प्रतिनिधीने पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष भरत पाटील यांच्याशी चर्चा करून याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी भरत पाटील म्हणाले की, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचा वेतन आस्थापना खर्चाच्या मर्यादा व शासकीय आदेशानुसार काही शेतमाल नियमनातून वगळल्यामुळे व गेल्या काही वर्षात कोरोना विषाणूचे संकट असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न प्राप्ती गाठता येत नव्हती म्हणून आजही पाचव्या वेतन आयोगानुसार होत आहे. या साऱ्याचा परिपाक म्हणून कर्मचाऱ्यांना निर्धारित बोनस देणे शक्य होत नव्हते. पूर्वी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीची सानुग्रह अनुदान देताना दोन महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान देण्याची परंपरा होती. काही तांत्रिक अडचणी आणि उत्पन्नप्राप्ती चे उद्दिष्ट न गाठले गेल्याने ही परंपरा राखणे शक्य होत नव्हते परंतु या वर्षी मात्र पुन्हा एकदा परंपरेनुसार पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचे वेतन हे सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस म्हणून मिळणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
हा निर्णय जाहीर झाल्यानंतर मला कर्मचाऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणून त्यासाठी मी सर्व आधिकारी/कर्मचाऱ्यांच्या वतीने सभापती मा. श्री .नारायण शेठ घरत आणि सर्व संचालक मंडळाचे आभार मानू इच्छितो.
Be First to Comment