नुकसान ग्रस्तांना उशिरा आणि तुटपुंजी नको, तर तातडीची भरघोस मदत द्या – विजय मोहिते पाटील
सिटी बेल ∆ पेण ∆
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यासह कोकणातील हजारो शेतकरी आणि नागरिकांचे शेतीचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे.मात्र ही नैसर्गिक आपत्ती झाल्यानंतर तातडीने पंचनामे तर झाले नाहीच शिवाय तातडीने जी भरघोस मदत जाहीर करायला हवी होती ती न करता तुटपुंज्या स्वरूपात मदत जाहीर करून नुकसान ग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने ही तुटपुंजी मदत न देता तातडीने भरघोस मदत जाहीर करावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले अशा इशारा भारत राष्ट्र समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष विजय मोहिते पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश खडे, तालुकाध्यक्ष राम पाटील, उपतालुकाध्यक्ष प्रकाश मोकल, जिते विभाग प्रमुख गणेश म्हात्रे, पूर्व विभाग प्रसाद वेदक, वाशी विभाग प्रदीप माळी, बळवली गावचे प्रमुख बळीराम पाटील, रावे गावचे रामभाऊ टावरी, पाटणेश्वरचे गाव प्रमुख भालचंद्र पाटील, उंबर्डे गावचे डी. एन. कांबळे आदिंसह महेंद्र पाटील, काशिनाथ पाटील, मोबीन झटाम, राजाभाऊ शिंदे, संदीप घरत, कमलाकर मोकल, दिपक पाटील, सुभाष पाटीलसह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.
भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र राज्यातील जनतेचे तळागाळातील प्रश्न सोडविण्याचे कार्य हाती घेतले असून आज पेण येथे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाचे विचार गावागावात, वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. याच वेळी त्यांनी पेण मधील ज्या शेतकरी आणि नागरिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे, घरांचे नुकसान झाले आहे त्याची पाहाणी करुन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून मिळालेल्या माहितीनूसार नुकसान होऊन आज पंधरा ते वीस दिवस होऊन गेले तरी अजूनही पंचनामेच सुरु आहेत. आणि पंचनामे झाल्यानंतर देखील जी उशीरा मदत मिळणार आहे ती देखील तुटपुंजी मदत मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने एकप्रकारे या नागरिकांची, या शेतकऱ्यांची फसवणूकच केली असल्याचा आरोप मोहिते पाटील यांनी करून राज्य सरकारने ही तातडीने आणि भरघोस मदत करावी अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करत आहोत. मात्र तरी देखील आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले तर आम्ही लवकरच या शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू असे सांगितले आहे.
Be First to Comment