नावडे येथे उभारली जाणार २५ हजार चौरस मिटर क्षेत्रावर रयत स्पोर्ट्स अकॅडमी
गोर गरीब,बहुजन,कष्टकरी समाजातील क्रिडा कौशल्य असणाऱ्या मुलांना विनामूल्य प्रशिक्षण देणार – मा आमदार बाळाराम पाटील
सिटी बेल ∆ कामोठे ∆
क्रिडा कौशल्य असणाऱ्या प्रत्येक मुलाला प्रशिक्षणावाचून वंचित राहू देणार नाही या भूमिकेतून आम्हाला काम उभारायचे आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय चेअरमन मा आमदार बाळाराम पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी रायगड विभागासाठी नावडे येथे २५ हजार चौरस मिटर क्षेत्रावर रयत स्पोर्ट्स अकॅडमी उभारणार असल्याची घोषणा केली. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित उन्हाळी क्रिडा प्रशिक्षण शिबिराचे बाबत प्रसिद्धी माध्यमांना अवगत केले. ते कामोठे येथील माजी आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
बाळाराम पाटील म्हणाले की, आम्ही येथे क्रीडापटू घडविण्याच्या उद्देशाने क्रिडा अकॅडमी उभारणार आहोत.ज्यात प्रामुख्याने गोर गरीब,बहुजन,दुर्गम विभागातील विद्यार्थ्यांना विनामूल्य क्रिडा प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पाच विभागांच्यात प्रत्येक ठिकाणी क्रिडा संकुल उभारून त्यात अकादमी सुरु करण्याचा प्रयत्न आहे. रायगड विभागाचे संकुल नावडे येथे उभारले जाईल.
नावडे येथील प जो म्हात्रे विद्यालयात १६ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान उन्हाळी क्रिडा प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या मध्ये शालेय विद्यार्थ्यांना ऍथलेटिक्स, कबड्डी,कुस्ती,खोखो, व्हॉलीबॉल, हँडबॉल,फुटबॉल या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सकाळी ७ ते साडेनऊ आणि सायंकाळी ४ ते साडेसात अशा दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या मान्यतेने आणि सहकार्याने संपन्न होणाऱ्या या शिबिरात खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. गणवेश तसेच दोन वेळ क्रिडा पोषक आहार खेळाडूंना मिळणार आहे. तांत्रिक गोष्टी शिकविण्यासाठी ऑडिओ व्हिजुअल क्लास,फिटनेस क्लास,फिजिओ मार्गदर्शन, इंज्युरी मॅनेजमेंट याशिवाय मोटिवेशनल सेशन्स यांचा सुद्धा यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नावडे येथील प जो म्हात्रे विद्यालयात उदघाटन संपन्न होणार आहे.
यावेळी सुप्रसिद्ध ऍथलिट ललिता बाबर आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त टेबलटेनिसपटू संजय कडू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ऍथलेटिक्स खेळासाठी मेघनाथ म्हात्रे,अजय कोळी,स्नेहल पाटील,कद्रीवाहन नाडर यांची समिती काम पाहणार आहे. गजानन हातमोडे कुस्ती चे प्रशिक्षण देतील,सूर्यकांत ठाकूर,विश्वनाथ पाटील,भालचंद्र पाटील, यांची समिती कबड्डी चे नियोजन पाहील. हर्षद पाटील,सुरज पाटील,गिता होले यांची समिती खो खो चे प्रशिक्षण देतील. समिर रेवाळे आणि किरण आंचन हे फुटबॉल प्रशिक्षण देणार आहेत तर नितीन घारे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना हँडबॉल चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी नाममात्र नोंदणी शुल्क र.५००/- असणार आहे.उन्हाळी क्रिडा शिबिराचे समन्वयक म्हणून प्रविण खुटारकर जबाबदारी सांभाळतील.
प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना मा आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, सहाय्यक विभागीय अधिकारी शहाजी फडतरे,मुख्य समन्वयक प्रविण खुटारकर,कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे सचिव सूर्यकांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरासाठी संपर्क
प्रविण खुटारकर 9773525777








Be First to Comment