Press "Enter" to skip to content

“मंदारस्कोप”

बॉयकॉट कशाला करायचा ???       

बहिष्कार प्रेमी जीवांनी समाज माध्यमांचा परिपूर्ण वापर करत लालसिंग चड्डा दणकून आपटवला.ब्रम्हा हिट झाला हो! असे चित्रपटकर्त्यांना आपटून आपटून सांगावे लागले. याच पार्श्वभूमीवर शाहरुख खानचा पठाण येतोय तोही आपटा अशी बोंब किमान गेली दीड वर्ष सुरू होती. मुळात मनोरंजनात्मक कलाकृतींचे विश्लेषण करणे ही माझी हातोटी नाही किंबहुना तो माझ्यासाठी थोडासा अप्रिय प्रकार आहे, परंतु केवळ बहिष्कारवाद्यांच्या भूमिकेविरोधात हटवादी भूमिका घेत हेतूपुरस्सरपणाने हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर बहिष्कार कशाला करायचा? हा प्रश्न माझ्या मनात उमटला आहे.
       

काश्मीर मधून आर्टिकल 370 हटविल्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत हे कथानक विणले आहे. आर्टिकल 370 हटविल्याने सगळ्यात जास्त कुणाच्या बुडाला मिरच्या लागल्या असतील तर तो पाकिस्तान असेल ही वास्तववादी भूमिका या चित्रपटात मांडली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात विराजमान भाजपा प्रणित सरकारने काश्मीर मधून आर्टिकल 370 हटविल्याची भूमिका कशी योग्य होती हेच अप्रत्यक्षपणे हा चित्रपट सांगायचा प्रयत्न करतोय. शाहरुख खान हिंदू विरोधी असल्याचा ठपका ठेवत हा चित्रपट निर्माण केला असल्याचा आरोप होतो आहे. संपूर्ण चित्रपटात असे कुठेही आढळून आले नाही. दहशतवाद्यांसमोर भारत झुकत नाही हा संदेश देखील या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे शाहरुख या “खानाचा” चित्रपट आहे या एकाच भूमिकेतून या चित्रपटाचा विरोध होताना दिसतो आहे.
         

वास्तविक भाजप द्वेष्ट्या तमाम राजकीय पक्षांनी आर्टिकल 370 हटविण्याच्या भूमिकेचे समर्थन करत असल्याचा राग मनात ठेवून या चित्रपटाचा बहिष्कार केला पाहिजे. एकूणच या बहिष्कार वाद्यांची मानसिकता ही मेंढराच्या कळपासारखी वाटते. कुठलाही सारासार विचार न करता किंवा सद्सदविवेक बुद्धीचा वापर न करता समाज माध्यमांवर आग,जाळ,धूर पसरवत सुटण्याच्या या भूमिकेचे कदापिही समर्थन करता येणार नाही. बॉलीवूड इंडस्ट्री जिहाद पसरवते आहे काय? ही इंडस्ट्री दाऊद इब्राहिम कासकर याच्या इशाऱ्यावर चालते काय? या इंडस्ट्रीमध्ये चित्रपट निर्मिती करता अंडरवर्ल्ड पैसा पुरवितो काय?ही इंडस्ट्री हिंदू विरोधी अजेंडा चालविते काय? या साऱ्या प्रश्नांची मसालेदार पद्धतीनं पेरणी करण्यापेक्षा कायदा आणि न्यायपालिका यांचा वापर करत त्याची पाळेमुळे खणून काढण्याची आवश्यकता आहे.
          

चित्रपटाच्या तांत्रिक बाबींकडे पाहिल्यास तो मला अत्यंत सुमार दर्जाचा वाटला. शाहरुख काकांनी असले उठपटांग स्टंट आणि मारधाड चित्रपट करण्यापेक्षा निवृत्ती स्वीकारलेली बरी. स्क्रीनवर लोकांसाठी त्याला सुसह्य बनविणे हे मेकअप मन, हेअर ड्रेसर्स आणि फॅशन डिझायनर यांच्याकरता एक आव्हान असेल. जॉन इब्राहिमने रंगविलेला जिम हा खलनायक शाहरुखच्या तुलनेत अधिक हँडसम, बाणेदार,कसदार, स्टायलिश आणि प्रभावी वाटतो. शिळ्या कढीला ऊत म्हणून चित्रपटात सलमानचा घुसवलेला सीन हे भौतिकशास्त्रला आव्हान ठरेल. दरीत कोसळणाऱ्या रेल्वे गाडीच्या डब्यांवर धावत, सुखरूप पणे रेल्वे ट्रॅक वर पोहोचणाऱ्या या दोघांचा स्टंट बघितला तर जुन्या काळातल्या हातिम ताई चित्रपटातले स्टंट बरे असे म्हणायची पाळी येते. मुळात व्ही एफ एक्स इफेक्ट करता अत्यंत स्वस्तातला आर्टिस्ट हायर केल्यासारखे वाटते. यापेक्षा जास्त प्रभावी इफेक्ट ॲनिमेटेड व्हिडिओ गेम मध्ये असतात. अगदीच वेळ जात नसेल आणि खिशातल्या दवडलेल्या दीडक्यांचे बद्दल मनात पश्चाताप निर्माण होणार नसेल तर चित्रपट पाहायला हरकत नाही. थोडे थांबल्यास कुठल्यातरी वाहिनीवर तो प्रदर्शित केला जाईलच. एकूणच बहिष्कार करा! हा या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरता वापरलेला निगेटिव्ह एक्सप्लोरिंग नावाचा मार्केटिंग फंडा तर नाही ना? अशी शंका सुद्धा मनात डोकावून गेली.
        

वास्तविक यापूर्वी ज्यांचे चित्रपट आपटले किंवा चालले ते त्यांच्यातील कंटेंट मेरिट मुळे. स्वतःला देवत्व प्राप्त झाल्याच्या अविर्भावात वागणाऱ्या सुपरस्टारना या निमित्ताने चपराक बसली हे देखील चांगले झाले. दक्षिणात्य भाषांतील डब झालेले चित्रपट आज खोऱ्यानं पैसा आणि प्रेक्षक वर्ग आपल्याकडे खेचत आहेत. तांत्रिक बाजू,संकल्पना, मांडणी, सजावट या साऱ्या बाबींमध्ये ते चित्रपट हिंदी चित्रपटापेक्षा उजवे ठरत आहेत. बहिष्कार वाद्यांवर आगपाखड करण्यापेक्षा बॉलीवूड इंडस्ट्रीने दक्षिणात्य भाषिक चित्रपटांप्रमाणे दर्जेदार कलाकृती निर्माण करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. हीरो हीरोइन च्या जीवावर चित्रपट चालविणे कालबाह्य झाले असल्याचे वास्तव स्वीकारले पाहिजे. स्टार किड्स च्या भांडवलावर उभे राहणारे चित्रपट प्रेक्षकांना रुचत नाहीत हे देखील समजून घेतले पाहिजे. कुणी कुठला चित्रपट बनवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल तर प्रेक्षकांनी कुठला पिक्चर बघावा हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे हवेत उडणाऱ्या बॉलीवूड इंडस्ट्रीने लवकरात लवकर आपले पाय जमिनीवर ठेवावेत आणि लोकांच्या मानसिकतेचे परीक्षण करत त्यांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न करावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.