केशव सीताराम ठाकरे अर्थात संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात असलेले प्रबोधनकार आणि रमाबाई ठाकरे यांच्या पोटी २३ जानेवारी १९२६ रोजी जन्मलेले बाळ पुढे उभ्या महाराष्ट्राचे बाळासाहेब झाले. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी या भगव्या वादळाने मराठी बांधवांना अखेरचा जय महाराष्ट्र केला. या दरम्यान बाळ ठाकरे ते बाळासाहेब ठाकरे या प्रवासाचे वर्णन करायचं म्हटलं तर एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाच्या वादळी प्रवासाची कहाणी वर्णन करावी लागते.व्यंगचित्रकार, शिवसेना संस्थापक, शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट! असा दैदिप्यमान प्रवास करण्यासाठी वाघाची छाती लागते, आणि बाळासाहेब तर संपूर्ण जीवन एखाद्या वाघासारखे जगले.
प्रबोधनकारांनी हिंदुत्ववादाचे व्यवच्छेदक विश्लेषण करताना कार्यकारण भावाची मोजपट्टी लावली. हिंदू धर्मातील बुरसटलेल्या रूढी परंपरा कर्मकांड यांच्यावर त्यांनी लेखणीचा तहहयात आसूड ओढला. हेच बाळकडू बाळासाहेब ठाकरे यांना प्राप्त झाले, प्रबोधनकारांचा हा वारसा त्यांनी अत्यंत सक्षमपणे चालविला. आठ भावंडांच्यात बाळासाहेब सगळ्यात ज्येष्ठ, दोन बंधू श्रीकांत ठाकरे ( राज यांचे वडील) रमेश ठाकरे तर संजीवनी करंदीकर,पमा (प्रेमा) टिपणीस, सुधा सुळे, सरला गडकरी, सुशीला गुप्ते अशा पाच भगिनी.१९३९ साली ठाकरे कुटुंब भिवंडीहून मुंबईमध्ये राहायला आले. बाळासाहेबांचे वय तेव्हा १४ वर्षांचे होते. इंग्रजी विषयाच्या अभ्यासाला सुरुवात सुद्धा न झालेला बाळ इंग्रजी पेपर मध्ये डोकं खुपसून बसलेला असतो हे प्रबोधनकारांच्या क्षणाक्ष नजरेने जाणले, त्यांनी बाळासाहेबांना हटकले आणि काय बघतोस रे त्याच्यात? असे विचारले. वास्तवात बाळासाहेब ठाकरे रोज त्यातली व्यंगचित्र अभ्यासत असत. प्रबोधनकारांनी विचारलं आवडतात का तुला ही चित्र? बाळासाहेबांनी हो म्हटल्यावर ते उत्तरले मग आज पासून काढायला घे. मग दिवसा बाळासाहेब व्यंगचित्र काढत आणि संध्याकाळी कचेरीतून आल्यावर प्रबोधनकार त्यात आवश्यक त्या सूचना करत असा दिनक्रम सुरू झाला.एके दिवशी बाबुराव पेंटर प्रबोधनकारांना भेटायला आले होते. पडवीमध्ये शतपावल्या घालत असताना त्यांचे लक्ष बाळासाहेबांनी काढलेल्या एका पोर्ट्रेट वर गेले. चौकशी केली असता ते बाळासाहेबांनी काढल्याचे त्यांना समजले. त्यांनी बाळासाहेबांना बोलावून घेतले आणि काय करतोस? असे विचारले, यावर मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये फी भरल्ये आणि उद्यापासून तिथे मी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाबुरावांनी प्रबोधनकारांना कळकळीची विनंती केली की बाळला तिथे पाठवू नका त्याचा “हात चांगला” आहे आर्ट स्कूलमध्ये घालून त्याला फुकट घालवाल, हवे तर मी त्याला कोल्हापूरला माझ्यासोबत घेऊन जातो. हा किस्सा सांगताना बाळासाहेब गमतीने म्हणत, साठ रुपये फुकट गेले पण हात मात्र वाचला!. व्यंगचित्र कलाकार म्हणून बाळासाहेब ठाकरे डेव्हिड लो याला आपला आदर्श मानायचे. हुकूमशाही राजवटीचा मेरुमणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अडॉल्फ हिटलरला सुद्धा एक व्यंगचित्रकार जेरीस आणतो या कल्पनेने बाळासाहेबांना भारावून टाकले होते.
फ्री प्रेस जर्नल मध्ये आर के लक्ष्मण यांच्यासोबत बाळासाहेबांचा परिचय झाला. बाळासाहेबांच्या मधला व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या सहवासात अधिक प्रगल्भ झाला. शंभर अग्रलेख जो परिणाम साधू शकत नाहीत तो एका व्यंगचित्र पोर्ट्रेट मधून सहज साध्य करता येतो हा विचार बाळासाहेब मांडायचे. व्यंगचित्रकार होण्यासाठी त्या व्यक्तीची स्वतःची अशी एक भूमिका असावी लागते, वैचारिक बैठक असावी लागते. विचारांची हीच बैठक बाळासाहेबांची अत्यंत भक्कम होती. नॅशनल टेलिव्हिजन च्या कॅमेरासमोर आय ए मॅड मॅड हिंदू! अशी भूमिका मांडण्याचे धाडस फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे या वादळातच होतं.
व्यंगचित्रकार होण्यासाठी आणखीन सगळ्यात मोठे भांडवल लागतं ते म्हणजे वाचन! एखादी बातमी, एखादी व्यक्ती यांचे व्यंगचित्र करायचं असेल तर त्या गोष्टीचा सखोल अभ्यास लागतो आणि तो जर नसेल तर तुम्ही व्यंगचित्र काढू नका अशी परखड भूमिका बाळासाहेब मांडायचे.
भाषिक प्रांतवार रचना करून मराठी बोलणाऱ्या लोकांचे “एक राज्य” निर्माण करण्याच्या भूमिकेने बाळासाहेबांनी १९५० साली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उडी घेतली होती.तत्पूर्वी १ जून १९४८ रोजी मिनाताईंशी त्यांचा विवाह संपन्न झाला. बिंदुमाधव,जयदेव आणि विद्यमान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे असे तीन चिरंजीव त्यांच्या संसार वेलीवर पुष्परूपाने उमलले. यातील बिंदू माधव यांचा रस्ता अपघातामध्ये दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला.
फ्री प्रेस जर्नल सोडून बाळासाहेबांनी ऑगस्ट १९६० मध्ये मार्मिक ची स्थापना केली. व्यंगचित्राच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या गोष्टींचा कान पिळण्याचे काम मार्मिक चपखलपणे करू लागले. यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते मार्मिकच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले होते. प्राध्यापक अनंत कणेकर यांच्यासारख्या दिग्गज प्रभूती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. मराठी माणसाच्या न्याय व हक्कासाठी मार्मिक आवाज उठवू लागला.समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे.महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला.
याच दरम्यान बालवांग्मय समाजमनसाशी जोडण्याचे काम सुद्धा बाळासाहेब करत होते.श्याम या लहान मुलांच्या पाक्षिकाचे संपादक म्हणून देखील ते काम पाहत होते.
हे सारे करत असताना मराठी माणसाचा उत्कर्ष साधायचा असेल तर हे प्रयत्न पुरेसे नाहीत हे जसे बाळासाहेबांचे मत होते अगदी तसेच मत प्रबोधनकारांचे सुद्धा होते. त्यामुळे मराठी माणसाचा उत्कर्ष, त्याचे भविष्य, त्याचे न्याय हक्क या साऱ्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून एक संघटना उभारली पाहिजे हा विचार बाळासाहेबांच्या मनात रुंजी घालत होता. यातूनच पुढे १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. याच दिवसापासून शिवतीर्थावरती हिंदुत्वाचा हुंकार भरण्याचा एक संस्कार बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दिला. ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी
शिवसेनेच्या पहिल्याच मेळाव्याला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी पाच लाख लोकांची गर्दी जमली होती. त्यानंतर प्रत्येक दसऱ्याला बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवतीर्थावरती पोहोचणे, हे प्रत्येक शिवसैनिक त्याचे परम कर्तव्य समजू लागला. महाराष्ट्रातील माझ्या तमाम हिंदू माता भगिनी आणि बांधवांनो! असे बाळासाहेबांच्या धीर गंभीर आवाजात ऐकल्यानंतर अक्षरशः अंगावरती रोमांच उभे राहायचे.महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला.
अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते.झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, Bombayचे Mumbai असे स्पेलिंग… अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या तथाकथित संस्कृतिविघातक पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच.
बाळासाहेबांनी राजकारणात (सत्ताकारणात) जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरक होय. जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था – साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, आनंद दिघे, दत्ताजी नलावडे, नारायण राणे …. असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची – सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.
शतके बदलतील, पिढय़ा बदलतील, पण बाळासाहेबांचा जन्मदिवस साजरा होत राहील. यालाच अमरत्व म्हणतात. हे अमरत्व बाळासाहेब जन्मतःच सोबत घेऊन आले.
बाळासाहेबांचा जन्म हा एका तेजाचा जन्म होता. म्हणून ‘तेज’ घेऊन शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा विडा उचलून महाराष्ट्रात अनेक अफजलखान आले व उताणे पडले. शिवसेनेला राजकीय मैदानात ‘पटकण्या’ची पोकळ डरकाळी फोडणारेही काळाच्या ओघात नष्ट झाले. शिवसेना ही लेच्यापेच्यांची संघटना नाही. म्हणून लढा भूमिपुत्रांचा असो नाहीतर हिंदुत्व रक्षणाचा, मर्दांच्या सेनापती प्रमाणेच बाळासाहेब वावरले.
शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी झाली. हा लढा घटनेच्या चौकटीत राहूनच त्यांनी सुरू केला. भाषावार प्रांतरचना घटनेनुसार झाली. त्याप्रमाणे इतर भाषकांना त्यांची राज्ये मिळाली. महाराष्ट्राला मात्र द्विभाषिक रेडय़ाचे लोढणे मिळाले. पुन्हा मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क नाकारला गेला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळावा यासाठी मराठीजनांना लढा द्यावा लागला. पोलिसांच्या लाठय़ा खाव्या लागल्या. पण बाळासाहेब खंबीर होते कारण ते सरळ साफ होते . त्यांनी लपवाछपवीचा खेळ केला नाही. कारण विचार आणि कृतीत भेसळ नव्हती. या देशात मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती होणे कठीण नाही, पण बाळासाहेब ठाकरे फक्त जन्मावे लागतात.
हिंदुत्ववादाचा ज्वलंत पुरस्कार करणारे या भारतातील बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते होते. आजही बाळासाहेबांनी शिवसेनेचे मुखपत्र म्हणून स्थापन केलेल्या दैनिक सामनाची टॅगलाईनही देखील हीच आहे. बाबरी मशीद पाडल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्यावेळेला जर बाबरी मशीद पाडणारा शिवसैनिक असेल तर त्याचा मला परिपूर्ण अभिमान आहे असं छातीठोकपणे सांगणारे बाळासाहेब ठाकरे हे एकमेवाद्वितीय होते. हिंदुत्ववादाचे नावाने राजकारण करणाऱ्या कित्येक नेत्यांनी सुद्धा वेळोवेळी बोटचेपी भूमिका घेतली. पण बाळासाहेबांनी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्ववादाचाच पुरस्कार केला. भारताच्या राष्ट्रपती पदावरती विराजमान होण्याचा मान जेव्हा एका मराठी व्यक्तीला आणि विशेषत्वाने एका स्त्रीला मिळतो आहे हे पाहता. नैसर्गिक युती म्हणून ज्या भारतीय जनता पार्टी ची ते साथ सोबत करत राहिले, त्यांच्या विरोधात जाण्याची धमक देखील फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याच ठायी होती.
मुंबई दंगल,अतिरेक्यांच्या धमक्या, मतदानाचा हक्क गमावण्याची पाळी, ठिकठिकाणी केसेस या साऱ्या संघर्षामध्ये बाळासाहेब खंबीर होते. जसं ५२ खणी सोनं कितीही तापवलं तरी प्रत्येक प्रक्रियेगणिक अधिक झळकत असते,अगदी तसेच बाळासाहेब सुद्धा प्रत्येक संकटागणिक झळाळत असायचे.१९९५ साली शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी विराजमान झाले, नारायण राणे यांना सुद्धा मुख्यमंत्री पदी संधी मिळाली,हा सगळा करिष्मा बाळासाहेबांचाच!
राजकारण करत असताना त्याला समाजकारणाची जोड दिली पाहिजे हा प्रगल्भ विचार या उभ्या महाराष्ट्राला बाळासाहेबांनी दिला. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचा कानमंत्र शिवसैनिकाला त्यांनी दिला. आज रक्तदान म्हटलं की शिवसेना शाखा! एवढीच डोळ्यापुढे उभे राहते. रुग्णवाहिका म्हटलं की वाघाचं चिन्ह असलेली आणि वाघाच्या डाव्या बाजूला शिव आणि उजव्या बाजूला सेना लिहिलेली ॲम्बुलन्स आपल्या डोळ्यापुढे येते. हे सारे सारे बाळासाहेबांच्या संस्कारामुळेच. त्यांच्यातील कुशल संघटकाने कामगार वर्ग भगव्या झेंड्याखाली एकवाटला. अकुशल बेरोजगार तरुणांना शिव वडापाव अभियानाने उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन प्राप्त करून दिले. शिवसेना या राजकीय पक्षाच्या घटनेनुरूप शिवसेना प्रमुख या पदाची निर्मिती झाली आणि अर्थातच त्या पदावर बाळासाहेब ठाकरे यांचाच हक्क होता. परंतु हिंदूहृदयसम्राट हे अनभिशषीक्त पद मात्र त्यांना जनता जनार्दनाने बहाल केले.
हिंदू धर्मातील अनिष्ट कर्मकांडांवरती परखडपणे भाष्य करत त्या बंद करण्याचे आवाहन करणारे बाळासाहेब हे प्रगतीवादी विचारांचे भोक्ते होते. श्राद्ध कर्म, कावळ्याला ताट वाढणे अशाने कुठले पूर्वज खुश होतात? असे ते जाहीरपणे विचारत असत. आज दुर्दैवाने हिंदुत्ववादाचा मुद्दा पुढे करत बाळासाहेबांच्या शिवसेनेची छकले झाली आहेत. कोण चुकतंय आणि कोण बरोबर आहे ह्याचा निर्णय करण्याइतपत मी मोठा नाही. पण बाळासाहेबांसारख्या वाघाने पराकोटीचा संघर्ष करून मराठी माणसाची हक्काची संघटना उभी केली, आणि त्या संघटनेचे असे तुकडे होत असतील तर ते माझ्यासारख्या बाळासाहेबांवरती नितांत प्रेम करणाऱ्या लेखकाला खचीतही पहावले जाणार नाही.
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करताना ज्याचं कोणाचं चुकतंय त्याला त्याची लवकरात लवकर उपरती व्हावी आणि त्याने नमते घेत एकोपा करावा व त्याच जोमाने शिवसेना पुन्हा एकदा मराठी माणसाच्या सेवेत रुजू व्हावी एवढीच मनोमन प्रार्थना करावीशी वाटते.
मंदार मधुकर दोंदे
समुह संपादक
सिटी बेल वृत्त समुह.
Be First to Comment