खारमाचेला येथील शेतकऱ्यांवर अन्याय : २६ डिसेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
पेण तालुक्यातील खारमाचेला येथील उघाडीचे काम जेएसडब्ल्यु कंपनीने पाईप टाकून बंद केल्यामुळे येथील शेकडो एकर जमीन नापीक होत असून शेतकऱ्यांसह मच्छीमारांवर अन्याय होत असल्याने अनेकदा बापदेव शेतकरी मंडळ खारमाचेला यांच्या माध्यमातून संबंधित प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला मात्र याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने अखेर येत्या २६ डिसेंबर २०२२ रोजी जवळपास २५ शेतकरी तसेच काही मच्छीमार आत्मदहन करणार असल्याची माहिती बापदेव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष सुनिल कोठेकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सदर जेएसडब्ल्यु कंपनीचा अधिक विस्तार करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांवर तसेच परंपरागत असणाऱ्या मच्छीमारी व्यवसायावर अन्याय करीत खारमाचेला येथील उघाडी (नैसर्गिक नाला) सर्वे नंबर ९४ या नाल्यात पाईप लाईन टाकून बंद केल्यामुळे बापदेव शेतकरी मंडळ खारमाचेला यांनी २०१४ साली तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे पत्रव्यवहार केला.

त्यावेळी त्यांनी तात्काळ आदेश देऊन संबंधित शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याचे सांगितले मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आमदार महेंद्र दळवी तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात आवाज उठविला तरीही कंपनी प्रशासन कोणालाही जुमानत नसल्याने शेतकऱ्यांवर होणा-या अन्यायामुळे आता शेवटची लढाई लढण्यासाठी शेतकऱ्यांनी २६ डिसेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्या असून याचे निवेदन संबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आले असल्याचे सुनील कोठेकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला सचिव सुभाष कोटेकर, सचिन कोठेकर, संतोष कोठेकर, लहू कोठेकर, ऋषिकेश कोठेकर, प्रथमेश कोठेकर, महेंद्र कोठेकर, स्थानिक मच्छीमार प्रसाद पाटील, सुधीर पाटील आदि उपस्थित होते.








Be First to Comment