माझं पेण संघर्ष समितीच्या वतीने मुंबई गोवा महामार्ग बंद
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
मागच्या बारा वर्षांपासून सुरु असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे निकृष्ट दर्जाचे होत असून महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हजारों नागरीकांचे बळी गेले आहेत त्यामुळे याविरोधात माझं पेण संघर्ष समितीच्या वतीने आज मुंबई गोवा महामार्गावरील पेण पशुसंवर्धन कार्यालया जवळ समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हजारों नागरीकांनी जवळपास एक तास महामार्ग रोखून धरला यामुळे दोन्ही बाजूकडील वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या होत्या.

राज्यातील अनेक महामार्ग सुसज्ज आणि खड्डेमुक्त झाले आहेत मात्र मुंबई गोवा महामार्ग हा एकमेव यापासून वंचित राहिलेला आहे.मागील बारा वर्षांपासून संथगतीने रस्त्याचे काम सुरू असून सध्यस्थितीत मोठमोठे खड्डे, खराब अंतर्गत रस्ते, साईट पट्ट्याही दुरावस्था, साईन बोर्ड व्यवस्था नाही, गतीरोधक नाही यासह पेण हद्दीत बांधण्यात आलेल्या बंदिस्त पुलामुळे शहर आणि ग्रामीण भाग यांची ओळख पुसत चाललेली असून भविष्यात येणाऱ्या पूरपरिस्थितीमुळे येथे भयानक अवस्था होणार असून सदर रस्ता वापरण्यायोग्य नसल्याचे हायकोर्टाने सुद्धा ताशेरे ओढले आहेत
तर खड्ड्यांमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण जाऊन अनेकांना अपंगत्व तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महीला, जेष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर स्त्रिया या सर्वांना प्रवास करणे नकोसे झाले असल्याने या विरोधात आज माझं पेण संघर्ष समितीच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले होते.
या दरम्यान पेण मधील हजारो नागरीकांनी महामार्ग एक तास रोखून धरल्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबवण्यात आली होती.महामार्गावर मानवी साखळी करुन बसलेल्या आंदोलनामध्ये गडब येथील तरुण सुशिल कोठेकर हे यमाच्या पेहरावात रस्त्यावर आंदोलनात सहभागी झाल्यांने हा रस्ता घातक झाला असून मृत्यूला कारणीभूत ठरत आहे.त्यामुळे याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

एक तास महामार्ग रोखून धरल्या नंतर आंदोलनकर्ते यांनी पेण प्रांत कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले असता या दरम्यान प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत नॅशनल हायवेचे अधिकारी यशवंत घोटकर यांनी आंदोलनकर्ते राजेंद्र पाटील, विजय कदम, स्वरुप घोसाळकर, राजन झेमसे, दिलिप पाटील, राजू पाटील, मुन्ना अखवारे, सुर्यकांत पाटील आदिंसह आंदोलनकर्त्यांना माहिती देताना सांगितले की, आपल्या मागणीनुसार पेण खारपाडा ते कासू पर्यंत टप्पा तसेच अंतर्गत रस्ते १५ तारखेपर्यंत चांगल्या प्रकारे खड्डे भरून पुर्ण करणार असून पलस्पे ते कासू काॅंक्रीटिकरणासाठी २३९ करोड रूपये आले असून लवकरच तेही काम सुरू होईल अगोदरचे ठेकेदार यांना काढून टाकले असून नविन एजन्सी काम सुरू केले आहे.

वाशी नाका ते गडब फ्लायओव्हर साठी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल तर वडखळ ते धरमतर रस्ता जेएसडब्ल्युच्या सीएसआर फंडातून करण्यात येणार आहे.रस्त्यावरील साइट पट्टी, साईन बोर्ड, गतीरोधक यांची योग्य प्रकारे कामे होणार आहेत.पलस्पे ते वडखळ पर्यंत चौपदरीकरणाचे काम झालेले आहे.काही खड्डे असतील ते सुसज्ज पद्धतीने चांगले भरण्यात येऊन टोल सुरू करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकारी यांनी लेखी पत्र आंदोलनकांना दिले.
यावेळी पोलिस उपअधिक्षक विजयकुमार सुर्यवंशी, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, आरटीओ अधिकारी महेश देवकाते, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, वडखळ तानाजी नारनवर, दादर सागरी गोविंद पाटील आदि उपस्थित होते.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.








Be First to Comment