मतदार याद्यांना आधार कार्ड जोडणी अभियान सुरू : बूथ लेवल ऑफिसर्स च्या माध्यमातून लिंक केले जात आहे आधार कार्ड
सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
भारतीय निवडणूक निर्णय आयोगाच्या वतीने मतदार यादी मधील मतदात्यांच्या आधार कार्ड जोडणीचे अभियान हाती घेण्यात आले आहे. बूथ लेवल ऑफिसर च्या माध्यमातून सदरचे अभियान राबविले जाणार आहे. सोमवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार विजय तळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बी एल ओ यांची आढावा बैठक पार पडली. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघ आणि १८९ उरण विधानसभा मतदारसंघ यांतील बूथ लेवल ऑफिसर्स नी आजपर्यंत केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा उपजिल्हाधिकारी मुंडके आणि तहसीलदार तळेकर यांच्यासमोर मांडला.
आढावा बैठकीनंतर माध्यमांना अवगत करताना उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके म्हणाले की, ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन अथवा नेटवर्क कमी असण्याची अडचण असेल त्या ठिकाणची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करण्याची तजवीज देखील करण्यात आलेली आहे. शहरी विभागातील सोसायट्यांचे अध्यक्ष,सचिव अशा पदाधिकाऱ्यांना आम्ही विनंती करत आहोत की येणाऱ्या बूथ लेवल ऑफिसर्स ना सहकार्य करून जास्तीत जास्त मतदात्यांची आधार कार्ड लिंक करण्याच्या अभियानास हातभार लावावा. तसेच शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या गरुड या एप्लीकेशन द्वारे नागरिक स्वतःचे आधार कार्ड मतदार यादीतील स्वतःच्या नावास लिंक करू शकतात.
ते पुढे म्हणाले की, मतदार याद्यांचे शुद्धीकरण न झाल्याने बऱ्याचदा निवडणुकीदरम्यान वादविवादाचे प्रसंग उभे राहतात. आधार कार्ड लिंक केल्यामुळे मतदार याद्यांचे शुद्धीकरण प्रक्रियेस फार मोठा हातभार लागेल. दुबार नोंदणी, मयत इसम, स्थलांतरित मतदाते हुडकण्याच्या दृष्टीने देखील हे अभियान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आधार कार्ड लिंक करण्यासाठी आपल्या दारी येणाऱ्या बूथ लेवल ऑफिसर्सना सहकार्य करावे अशी विनंती करतो. काही बी एल ओज नी 80 टक्के हुन अधिक आधार कार्ड लिंक केलेली आहेत, त्यांचा आदर्श अन्य बुथ लेवल ऑफिसर ने घ्यावा आणि हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपले योगदान द्यावे.
सदर अभियानाची पुढील आढावा बैठक सोमवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.








Be First to Comment