नदी पात्रात सोडण्यात येते केमिकल युक्त सांडपाणी
सचिन तेलंगे यांचे तहसीलदारांना निवेदन
सिटी बेल ∆ पाली/बेणसे ∆ धम्मशिल सावंत ∆
लाखो लोकांची तहान भागवणारी आंबा नदी दिवसेंदिवस जलप्रदूषणाच्या विळख्यात सापडलीय. जवळपासच्या कंपनीमधील सांडपाणी हे पिण्याचे पाण्याचे महत्वाचे स्रोत असलेल्या आंबा नदी पात्रात सोडले जात असल्याने इथले पाणी पिऊन आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळण्यासारखेच वा मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे. सुधागड तालुक्यातील रासळ गावाजवळील सनशिल्ड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी लगत असलेल्या नाल्यात कंपनीचे केमिकल युक्त दूषित सांडपाणी सोडले जात आहे. आणि हे पाणी येथील आंबा नदीत मिसळत असल्याने पालीसह तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याप्रकरणी जिल्हा व तालुका प्रशासनाने तात्काळ व गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी येथील जागरूक ग्रामस्थ सचिन तेलंगे यांनी प्रशासनाकडे केलीय. यासंबंधीचे निवेदन सचिन तेलंगे यांनी नुकतेच तहसीलदार दिलीप रायण्णावर यांना दिले.
या निवेदनात सचिन तेलंगे यांनी नमूद केले आहे की सदर कंपनीतील केमिकलयुक्त सांडपाणी मोठ्या प्रमाणात अनेक दिवसांपासून या नाल्यात सोडले जात आहे. हा नाला अंबा नदीच्या अगदी जवळ असल्याने नाल्याचे केमिकलयुक्त दूषित सांडपाणी थेट आंबा नदी पात्रात जाऊन मिळत आहे. अंबा नदीच्या पात्रालगत अनेक गावे आहेत. पाण्यासाठी येथील नागरिकांना आंबा नदीचा मोठा आधार आहे, बाराही महिने इथल्या गावांना अंबा नदीतूनच पाणीपुरवठा होतो. परिणामी या दूषित केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे सुधागड तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

त्यामुळे याबाबत लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सचिन तेलंगे यांनी केली आहे. सदरचे निवेदन माहितीसाठी रायगड जिल्हाधिकारी, नगरपंचायत पाली, ग्रामपंचायत रासळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे देखील देण्यात आले आहे.
या तक्रारी निवेदनाची तात्काळ दखल घेतली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करताना सचिन तेलंगे यांनी योग्य कार्यवाही न झाल्यास या प्रश्नी तीव्र जनआंदोलन छेडू असा इशारा देखील दिलाय.








Be First to Comment