५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षक दरबारी दाखल होणार
‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग आहेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी हा सर्वात महत्त्वपूर्ण कालखंड होता. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी महाराजांनी फत्ते केली.
आग्रा मोहिमेचा हा रोमांचकारी इतिहास ५ ऑक्टोबरला मराठी रुपेरी पडदयावर आणण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे सज्ज झाले आहेत. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.
मोगल बादशाहांमध्ये औरंगजेब असा एकमेव शासक होऊन गेलाय ज्याने आपल्या चातुर्यपूर्ण रणनीतीनी मोगल साम्राज्याचा विस्तार केला होता. इतिहासातला सर्वात क्रूर कपटी, जुलमी, धर्मांध बादशाहा अशी ओळख असलेल्या औरंगजेबाची भूमिका ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात कोण साकारणार ? याची उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून शिगेला पोहोचली होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर ही भूमिका साकारणार आहेत.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना यतीन कार्येकर सांगतात, मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम खलनायकी भूमिका साकारणारे अनेक कलाकार होऊन गेले. या खलनायकांवरही रसिकांनी प्रेम केलंय. याआधीही मालिकेमध्ये मी औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. पण आता मोठया पडदयावर ती साकारण्याचा वेगळाच आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसमोर तितक्याच तोलामोलाचा औरंगजेब साकारणं महत्त्वाचं होतं. औरंगजेबाच्या स्वभावातला बेरकीपणा, कावेबाजपणा माझ्या भूमिकेच्या माध्यमातून प्रभावीपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला प्रेक्षकांची पसंती मिळेल अशी आशा आहे.
Be First to Comment