
महाराष्ट्रातील युवांसाठी “युवा कल्याण बोर्ड ” असावे,आमदार विक्रांत पाटील यांची विधानपरिषदेत ठोस मागणी
मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या भविष्याचा कणा असलेल्या युवांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत आमदार विक्रांत पाटील यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेदरम्यान अत्यंत प्रभावी आणि मुद्देसूद भूमिका मांडली. “युवांकडे लायबिलिटी म्हणून नव्हे, तर सर्वोच्च परतावा देणारा ॲसेट आणि गुंतवणूक म्हणून पाहण्याची गरज आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यात ५५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही युवांची असताना त्यांच्या समस्यांसाठी एकसंध धोरण आणि समन्वय यंत्रणा नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विविध विभागांत अनेक योजना असल्या तरी त्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने युवांपर्यंत पोहोचतो का, याचे केंद्रीकृत मॉनिटरिंग होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवकांमध्ये वाढती बेरोजगारी आणि दुसरीकडे उद्योगांना योग्य कौशल्य असलेले मनुष्यबळ न मिळणे, हा मोठा विरोधाभास असल्याचे अधोरेखित करत त्यांनी “जॉब शोधणारे आणि जॉब देणारे यांच्यातील दुवा तयार करणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज” व्यक्त केली. रायगडसारख्या जिल्ह्यात येणाऱ्या हजारो कोटींच्या प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी पूर्वतयारीत कौशल्य विकासावर भर देण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच, १०वी-१२वी नंतर विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शनाचा अभाव, परदेशात शिक्षण/नोकरीसाठी जाताना होणारी फसवणूक, नोकरीत होणारे अन्याय, बॉन्ड प्रणालीतील अडचणी, वेतन प्रश्न यांसारख्या अनेक गंभीर मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. युवकांसाठी सल्ला, मदत आणि न्याय मिळवण्यासाठी एक सक्षम प्लॅटफॉर्म नसल्यामुळे अनेकांना नैराश्य, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीकडे वळावे लागत असल्याची चिंताजनक बाब त्यांनी मांडली.
या पार्श्वभूमीवर आमदार विक्रांत पाटील यांनी सरकारकडे युवांसाठी “युवा कल्याण बोर्ड ” असावे,एक अत्यंत महत्त्वाची आणि ठोस मागणी केली.
या आयोगाला विशेष अधिकार देऊन, युवकांच्या सर्व समस्या एकाच छताखाली सोडवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, ज्यामुळे रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास, मार्गदर्शन आणि तक्रार निवारण या सर्व बाबी एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील, अशी मागणी त्यांनी केली.राज्यात महिला कल्याणासाठी महिला आयोग आणि विविध समाजासाठी sc/st आयोग आहेत ते चांगलेच आहे त्याच धर्तीवर युवा कल्याण आयोग व्हावा ही मागणी आ. विक्रांत पाटील यांनी केली.
दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आमदार विक्रांत पाटील यांनी मांडलेले प्रश्न आणि सुचवलेले उपाय हे राज्याच्या युवा धोरणासाठी दिशादर्शक ठरणारे असल्याची भावना सभागृहात व्यक्त केली व या विषयात मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याबाबत त्यांनी आश्वस्थ केले.तसेच सरकारकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत कौशल्य विकास, परदेशी रोजगार, आयटीआय सक्षमीकरण आणि स्टार्टअप प्रोत्साहन यावर सरकार ठोस पावले उचलत असल्याचे सांगितले.




Be First to Comment