Press "Enter" to skip to content

शांतता समितीवर प्रदीप (आप्पा) देशमुख यांची पूनर्रनिवड

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात सहकार्याची भूमिका ; देशमुख

सिटी बेल ∆ धाटाव ∆ शशिकांत मोरे ∆

रोहा शहर, तालुका स्तरावर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच विविध नागरी समस्या सोडविण्यात आग्रही असणाऱ्या रोहा सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख यांची जिल्हा शांतता समितीवर पूनर्रनिवड निवड करण्यात आली. तसे पत्र तहसिलदार कविता जाधव यांनी प्रदीप (आप्पा) देशमुख यांना शुक्रवारी दिले. निवडीनंतर शहर, तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखासंबंधी प्रशासकीय कार्यात सहकार्याची भूमिका अधिक प्रभावीपणे बजावली जाईल अशी प्रतिक्रीया आप्पा देशमुख यांनी दिली.

जिल्हा शांतता समितीवरील निवडीनंतर आप्पा देशमुख यांनी तहसिलदार कविता जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी नायब तहसिलदार राजेश थोरे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सामाजिक कार्यकर्ते अनंत देशमुख व मान्यवर उपस्थित होते. यावेळी तहसिलदार कविता जाधव यांनी देशमुख यांना जिल्हा शांतता समितीवरील सदस्य नियुक्तीचे पत्र बहाल केले. तहसिल, पोलीस प्रशासन अखत्यारितील सामाजिक स्वास्थसंबंधी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या चर्चेत धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्या थेट रस्त्याच्या दुतर्फा कामगारांच्या दुचाकी वाहने पार्किंग करतात, त्यात युनिकेम, बेक केमिकल, सुदर्शन, कोरस कंपन्या आघाडीवर आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी वाहने सर्रास उभी असल्याने अपघाताला वारंवार निमंत्रण मिळत आहे. याबाबत एमआयडीसी, पोलीस प्रशासनाला नेहमीच सांगण्यात आले, पण अद्याप कार्यवाही नाही, हा सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा मुद्दा तहसीलदार कविता जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्यासमोर पुन्हा उपस्थित केला. त्यावर तातडीने एमआयडीसी अधिकारी, पोलीस प्रशासन, कंपन्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्वाचा मुद्दा सोडवू असे आश्वासन संबंधीत प्रशासनाने दिले.

शांतता समितीवरील निवडीनंतर आप्पा देशमुख यांनी कायदा व सुव्यवस्था सबंधी मुद्दा उपस्थित करून कामाला प्रारंभ केले. आप्पा देशमुख यांच्या निवडीचे खा. सुनील तटकरे, माजी पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, तहसीलदार कविता जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था प्रशासकीय कार्यात सहकार्याची भूमिका अधिक प्रभावी राहील अशी प्रतिक्रिया आप्पा देशमुख यांनी दिली तर आप्पा देशमुख यांच्या जिल्हा शांतता समितीवरील निवडीने विविध प्रश्नांच्या सोडवणुकीच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळाल्याचे सार्वत्रिक मत अधोरेखीत झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.