Press "Enter" to skip to content

मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

अवघ्या तीन दिवसांवर कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळख असलेला गणेशोत्सव आला आहे. प्रत्येकाच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. परंतु ज्या मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणवासी बाप्पाला घेऊन गणेशोत्सवासाठी आपल्या घरी जात असतात त्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले होते. मात्र पेण पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्थेने पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनाने प्रशासनाला जाग आली असून मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर येथील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.

काही वर्ष दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई- गोवा महामार्गाची व्यथा, वनवास काही केल्या संपत नाही. दरम्यान दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो.

कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणामार्फत हे खड्डे तातडीने बुजवणं गरजेचं होतं. मात्र कासू ते इंदापूर हा 42 किलोमीटरचा रस्ता उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ असल्यामुळे हे काम बरेच महिने रखडले गेले. त्यामुळे प्रवाशांना या महामार्गावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही 1 जुलै पासून आत्तापर्यंत जेसीबी व इतर मशनरी वापरून तात्पुरती डागडुजी सुरू होती. मात्र जनतेला नाहक या खड्ड्यांना सामोरे जावे लागत असल्याची दखल पेण पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्था यांनी घेऊन पेण महामार्गावर स्वखर्चाने व श्रमदान करून खड्डे भरण्यासाठी जनआक्रोश आंदोलन पुकारला आहे. याच जन आक्रोश आंदोलनाने प्रशासनाने जाग येऊन महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. आज पर्यंत अंदाजे पेण ते नागोठणे व भिरा फाटा ते इंदापूर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबई गोवा महामार्गाबाबत सह्याद्री अतिथीगृहात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि नॅशनल हायवे, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत राज्याचे नवनिर्वाचित बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बैठक आयोजित करत प्रत्येक जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीचे काम करणाऱ्या एजन्सीज वाढवून येत्या आठवड्यात प्रामुख्याने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. व सदर कामाच्या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या तातडीच्या बैठकीत सदर कामाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा मार्फत मे.रामेश्वर कन्स्ट्रक्शन पेण व मे.जे.एम्.म्हात्रे इन्फ्रा प्रा.लि. व अन्य तीन कंपन्यांना देण्यात आला. या कंपन्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर आत्तापर्यंत जेएसबी, बोझर, सिमेंट कोंक्रीटीकरण, डांबरीकरण, हॉटमिक्स्चरच्या व इतर मशिनरीच्या सहाय्याने खड्डे बुजविण्याचे काम सध्या जोरात सुरू केले आहे.

आगामी गणेशोत्सव सण व पेण पत्रकार, सह्याद्री, सोबती संस्थांच्या जन आक्रोश आंदोलनामुळेच खऱ्या अर्थाने प्रशासन नमले असून त्यांनी सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केल्याचे आम्ही काल केलेल्या सर्व्हेत निदर्शनात आले असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचे समीर म्हात्रे यांनी बोलताना सांगितले.

प्रशासनाने योग्य पद्धतीने मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वच्या सर्व खड्डे भरले नाहीत तर कोकणातील गणेशभक्तांसाठी आम्ही राहिलेले खड्डे स्वखर्चाने व श्रमदानातून भरणार असल्याचे मंगेश नेने यांनी जन आक्रोश आंदोलनाचे पेण पत्रकार, सह्याद्री प्रतिष्ठान व सोबती संस्था याच्या वतीने जाहीर केले.

डागडुजीसाठी ठेकेदारांची नियुक्ती

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पळस्पे ते इंदापूर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे आदेश दिले असून यासाठी मे.रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका, मे.जे.एम.म्हात्रे कंपनी असे पाच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे. रस्त्यावर डांबर, खडी, सिमेंटकाँक्रीट टाकून हे खड्डे बुजवले जात आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.