सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
संजय वझरेकर लिखित शिवकालीन दिनविशेष या पुस्तकाचे प्रकाशन आज कर्जत मध्ये करण्यात आले. संजय वझरेकर यांचे दिनविशेष या स्वरूपाचे हे सातवे पुस्तक आहे, याआधी त्यांचे तारखेत काय अर्थात तारखांचे मानकरी भाग एक दोन, टर्निंग पॉईंट ,गाथा क्रांतीवीरांची, साहित्यिकांची मांदियाळी, पर्यावरणीय दिनविशेष अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.त्यांच्या टर्निंग पॉईंट या पुस्तकास महाराष्ट्र राज्य शासनाचा गोपीनाथ तळवळकर बाल साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच तारखेत काय आहे? अर्थात तारकांचे मानकरी भाग एक या पुस्तकात पुणे मराठी ग्रंथालयाचा ना.ह .आपटे आणि रायगड जिल्हा पत्रकार संघाचा साहित्यिक राजा राजवाडे हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
कर्जत येथील लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय या ऐतिहासिक वास्तूमध्ये एका छोट्याखाली कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या पुस्तकाचे प्रकाशन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका खुशबू चौधरी यांच्या शुभहस्ते आणि कर्जत नगरपरिषद नगराध्यक्ष सुवर्ण जोशी यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले,.
याप्रसंगी लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दीपक बेहेरे, चिटणीस सुचिता जोगळेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुचिता जोगळेकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत आणि त्यांचा परिचय लेखक संजय वझरेकर यांनी करून दिला. तर पुस्तकाचा परिचय लेखिका मृदुला गडनिस यांनी केला. त्यांनी पुस्तकावर भाष्य करताना साहित्यिक सदानंद मोरे यांचे यांची या पुस्तकात प्रस्तावना लाभली आहे असे सांगितले, वझरेकरांनी शिवकालीन दिनविशेष या पुस्तकातून 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 म्हणजे शिवजन्मापासून ते शिवरायांच्या महानिर्वानापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या कालखंडातील तारखेसह पाचशे घटना शब्दबद्ध केल्या आहेत. कोमल प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले.
वझरेकरांनी या पुस्तकास शिवकालीन घटनांना दिलेली आकर्षक शीर्षके याचा आवर्जून उल्लेख केला. या पुस्तकातून शिवकालातील अनेक घटनांवर कसा प्रकाश पडतो यावर त्यांनी भाष्य केले.उदाहरणार्थ आग्रा प्रकरण म्हणजे शिवाजी महाराजांची फक्त औरंगजेबाच्या दरबारात झालेली भेट एवढेच आपल्याला माहिती असते. परंतु यावर आधारित वीस एक दिनविशेषश वझरेकरांनी शोधून काढलेत. तसेच शिवकाळात मुंबई इंग्रजांच्या घशात कशी गेली, सुरत प्रकरण, इंग्रजांशी शिवरायांचा झालेला पत्रव्यवहार ,शिवराय आणि पोर्तुगीजांचे संबंध असे विविध ऐतिहासिक प्रसंग आपल्या लेखणीतून त्यांनी कशा जिवंत केल्या. याची माहिती उपस्थितांना दिली, पुस्तक लिहिण्यास रिलायन्स फाउंडेशन स्कूलचा कसा मोलाचा वाटा आहे असे सांगितले.
नगराध्यक्ष सुवर्ण जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिवचरित्राची महती सांगून शिवकालीन दिनविशेष या पुस्तकातील विविध शिवकालीन घटना समाजाला आणि विशेषता विद्यार्थ्यांना कशा प्रेरणादायी ठरू शकतात यावर भाष्य केले.नगरसेविका खुशबू चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कर्जत सारख्या छोट्या शहराला इतका मोठा सांस्कृतिक वारसा असू शकतो, असे म्हणून लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. तसेच वझरेकरांच्या संशोधक वृत्तीला दाद देऊन शिवरायांप्रमाणे संभाजी राजांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा धांडोळा दिनविशेषणाच्या स्वरूपात घ्यावा घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दीपक बेहेरे यांनी केले.
या कार्यक्रमास साहित्यिक दिलीप गडकरी, कृषी विभागाचे संशोधक रविंद्र मर्दाने, रिलायन्स फाउंडेशनच्या विज्ञान शिक्षिका वैष्णवी मोडक, मिलिंद मोहिते, महेश होनावर, प्रशांत जगताप, मंगेश वझरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment