“शब्दांकित” आणि “माझं क्षितिज” या पुस्तकांचे शानदार प्रकाशन
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रमुख आणि मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य कर्जतचे डॉ. नितीन आरेकर लिखित ‘शब्दांकित’ आणि ‘माझं क्षितिज’ या पुस्तकांचे मुंबईत शानदार सोहळ्यात प्रकाशन झाले. यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. नितीन आरेकर लिखित ‘शब्दांकित’ आणि ‘माझं क्षितिज’ पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन रवींद्र नाट्य मंदिर मध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी संगीत साम्राज्ञी पद्मभूषण बेगम परवीन सुलताना, अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, कवी अरुण शेवते, संतोष रोकडे आदी उपस्थित होते.
परपल इव्हेंटचे संतोष जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांनी पुस्तकां बद्दलची माहिती सांगितली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी आरती कदम, मुखपृष्ठकार सतीश भावसार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अरुण शेवते यांनी आपल्या मनोगतात, ‘नितीन आरेकर हा एक माणस जोडणारा माणूस आहे. त्यांचे शब्दांकन म्हणजे प्रत्यक्ष लेखातील माणूसच आपल्याशी बोलतोय की काय? असे वाटते. शब्दांकन खूप सामर्थ्य शाली असते. ते कलावंताला न्याय देतात. नदीचे नाव आठवते परंतु झऱ्याचे नाव आठवत नाही. मात्र या कार्यक्रमात याला अपवाद आहे. असे स्पष्ट केले. मनोज जोशी यांनी पुस्तकातील त्यांच्यावरच लिहिलेला ‘भाई’ हा लेख वाचून दाखविला. त्यावेळी ते अगदी भावनावश झाले. यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले.
परवीन सुलताना यांनी, ‘मोठे पण जपण्यासाठी आपल्याला बळ हवे असते. जीवनाचे दुसरे नाव प्रयत्न आहे. आपल्या विषयात खोलवर जातो तोच खरा कलाकार असतो. माझी आसाम जन्मभूमी मात्र लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांनी मला जाऊन दिले नाही. हिंदुस्थानी संस्कार, परंपरा आम्ही येथेच शिकलो. अनुभव हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो. मेहनत सर्व समस्यांचे उत्तर देतो. ‘रियाज करे ओ राज करे’ रियाझ फक्त गळ्याचा नसतो. आत्मा व मनाचा पण असतो. संगीत आराधना आहे त्याच्याशी आम्ही बेईमानी करीत नाही. आम्ही दिखावा करीत नव्हतो. हल्ली सर्व बदलले आहे. आरेकर यांनी सर्व विषयांवर लिखाण करावे.’ असा सल्ला दिला. त्यांनतर त्यांनी भवानी दानी….. हे गीत सादर करून आपल्या आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
नितीन आरेकर यांनी आपल्या मनोगतात, ‘तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद व सदिच्छांमुळे मी आज इथ पर्यंत येऊन पोहोचलो आहे. मी कितीही मोठा झालो तरी जमिनीवरच असेन. माझ्यावर प्रेम करणारे आज येथे उपस्थित आहेत. हा दिवस मी कधीही विसरणार नाही. कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी , ‘अशा कार्यक्रमांना येईन असे स्वप्नातही वाटले नव्हते परंतु ते भाग्य मला मिळाले असे मी मानतो. आरेकरांशी संबंध आल्यानंतर त्यांनी माझ्याकडून कविता संग्रह करून घेतला. खरे तर मी विज्ञानाचा विद्यार्थी परंतु ही सारी किमया त्यांच्यामुळेच घडली. माणसाने आयुष्यभर शिकत रहावे व केवळ शाळेत किंवा महाविद्यालयातील शिकवणारे शिक्षक असतात असे नाही तर तुम्ही प्रत्येक जण शिक्षक आहात. प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला न मिळते.’ असे आदरपूर्वक सांगितले. डॉ. समीरा गुजर – जोशी यांनी खास शैलीत सूत्रसंचालन करून सोहळ्यात रंगत आणली.
याप्रसंगी राजेंद्र पै, अतुल परचुरे, ज्ञानदा पेंढारकर, अरुण म्हात्रे, कौशल इनामदार, अतुल परचुरे, सोनिया परचुरे, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, रवींद्र आरेकर, किशोर वैद्य, गिरीश आरेकर, प्रियांका साठे, दिलीप गडकरी, प्रसाद पाटील, राजाभाऊ कोठारी, रंजन दातार, प्रभाकर करंजकर, प्रदीप गोगटे, गणेश वैद्य, श्रीकांत ओक, दिपचंद ओसवाल, वालचंद ओसवाल, मुकुंद मेढी, विवेक मुझुमदार आदींसह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment