सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
गणेशोत्सव व इतर सण कायद्याचे पालन करुन शांततेत व गुण्यागोविंदाने साजरे करा असे आवाहन रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी रसायनी पोलिस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या शांतता कमिटी, पोलिस पाटील व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिका-याच्या समन्वय बैठकीत केले.जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, उपविभागीय अधिकारी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे बोलत होते.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे म्हणाले की, गणेशोत्सवात विद्युत रोषणाई करताना अपघात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.कोणत्याही बेवारस वस्तूंना हात लावू नये, शिवाय आपल्या एटीएमबद्दलची माहिती कोणी मागत असल्यास त्याला देऊ नये तसेच आपली वाहने बाजारात पार्किंग न करता काही अंतरावर ठेवून पायी चालल्यास व्यायाम होईल यामुळे वाहतूक कोंडीही टळेल, गणेशोत्सव हा सण शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.जनतेनेही या काळात शांतता व संयम राखावा.कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात सर्वांनी मास्क वापरावा.कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी केले.शिवाय आगामी सणांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटीलांनी सतर्क राहावे.
यावेळी शांतता कमिटी पदाधिकारी व सदस्य, पोलिस पाटील, श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या समस्या जाणून निराकरण करण्यात आले.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे, पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे, पोलिस नाईक विशाल झावरे यांच्यासह पोलिस कर्मचारी व रसायनी परिसरातील नागरिक उपस्थित होते.








Be First to Comment