Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवा निमित्ताने सिटीबेल लाईव्ह वर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवींकडून स्वतंत्र भारताला काव्य पुष्पांनी मानवंदना

स्वातंत्र्यदिन

पंधरा ऑगस्ट हा दिवस होता
एकोणिशे सत्तेचाळीस साल होता
गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यास
अखंड भारत साथ होता

हसत लटकले कुणी फासावर
गोळी झेले कुणी छातीवर
भोगला कुणी तीव्र कारावास
कुणास लाठी पडली हमखास

गांधी नेहरू भगत टिळक
सावरकर आझाद लोकनायक
सरदार देशबंधु आणि सहाय्यक
मनावर कोरली यांची ओळख

किती जणांनी बलिदान केले
आनंदाने आपले घरदार फुंकले
सळो की पळो इंग्रजांना केले
तेव्हा आम्हांला स्वातंत्र्य दिसले

त्यागाचा हा रंग केशरी श्वेत रंग शांतीचा असे
समृद्धीचा हिरवा रंग अशोक चक्र निलवर्णात असे
लाखात शोभे तिरंगा अमुचा
अभिमान भरते उरात जसे

जय हिंद

अजय शिवकर
केळवणे पनवेल*
७५५९१११६४८
७९७७९५०४६४


🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶


*माझा भारत महान*

पराक्रमी देश माझा
शूरवीर जवानांचा
क्रांतिवीर देशभक्त
अभिमान आम्हां यांचा..१

सुजलाम सुफलाम
सुबत्तेची धान्यराशी
शांती एकता बंधुता
सौख्य नांदे मजपाशी..२

घुमे नाद आसमंती
मावळ्यांचा इतिहास
जय भवानी मातेचा
आशीर्वाद हमखास..३

ध्वज लहरे आकाशी
होई जल्लोष गगनी
मिळो आनंद अंतरी
सत्यमेव ब्रीद मनी..४

अशा भारत देशाचा
जगी वाढवूया मान
भारतीय असल्याचा
आहे सार्थ अभिमान..५

*©®सुचित्रा कुंचमवार*
*नवी मुंबई*


🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶


*भारत महान देश **


प्रतिकात्मक तिरंगा ज्याची शान आहे. असा देश माझा भारत,साऱ्या जगतात महान आहे.

कोणी म्हणेल काय या देशात
गरीबी, महागाई, खून
दहशतवाद, भ्रष्टाचाराचीच वाढ आहे .
पण हेही कसं विसरून चालेल.
परंपरा अन् पराक्रमाचा
माणुसकी अन् संस्कृतीचा वारसाही
माझ्याच देशास लाभला आहे.
म्हणून म्हणतो प्रतिकात्मक
तिरंगा ज्याची शान आहे.
असा देश माझा भारत
साऱ्या जगतात महान आहे.

गरीबी ,महागाईचा पारा
जरी असला वाढत,
कष्टाची भाजी भाकरी
खाणारा बसत नाही कण्हत.
असा उभ्या जगाचा पोशिंदा
शेतकरी बाप माझा,
याच मातीत जन्मला आहे..
म्हणूनच म्हणतो प्रतिकात्मक तिरंगा त्याची शान आहे.
असा देश माझा भारत,
साऱ्या जगतात महान आहे.

खूनी, दहशतवादी हल्ल्याची
भिती आम्हास वाटत नाही .
बंदूकीच्या गोळ्यांनी, सीना छन्नी झाला
तरी’ मागे सरणार नाही
असा पराकरमाचा वारसा
जपणारा शिवबाचा मावळा
याच मातीत जन्मला आहे ,
म्हणूनच म्हणतो प्रतिकात्मक
तिरंगा ज्याची शान आहे
असा देश माझा भारत माझा,
साऱ्या जगतात महान आहे.

माहीत आहे मजला,
लबाड्या करून, स्वार्थ साधणाऱ्यांची
या देशात कमी नाही,
पण , माझ्या सारख्या दीनदुबळ्याना मनाने वागवण्यातही देश माझा मागे नाही.
असा माणुसकी जपणाराही
याच मातीत जन्मला आहे.
म्हणूनच म्हणतो, प्रतिकात्मक
तिरंगा ज्याची शान आहे.
असा देश माझा भारत,
साऱ्या जगतात महान आहे.

कितीही ब्रँडेड परफ्यूम वापरला
तरी, उठण्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही ,
गाडीतून जातानाही मंदिर दिसताच हात जोडल्याशिवाय राहतच नाही.
अशी महान संस्कृती जपणाराही
याच मातीत जन्मला आहे.
म्हणूनच म्हणतो,
प्रतिकात्मक तिरंगा ज्याची शान आहे.
असा देश माझा भारत
साऱ्या जगतात महान आहे.

कवी,लेखक महंताची परंपरा असणारा ,
जे न देखे रवि… ते शब्दांतून मांडणारा – कुसुमाग्रज, यशवंत,केशवसूत पाडगावकर यांसारख्या कवीवर्ग
याच मातीत जन्मला आहे.
म्हणूनच म्हणतो ,प्रतिकात्मक
तिरंगा ज्यांची शान आहे,
असा देश माझा भारत, साऱ्या जगतात महान आहे.



श्री अंकुश नथुराम जाधव,
निवी रोहा




🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶



चारोळी
विषय:- स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी


भारत स्वातंत्र्याला झाली
आज पंच्याहत्तर वर्ष।
तिरंगा फडकताना
होईल मनाला हर्ष ॥


सौ नैनिता नरेश कर्णिक मुरूड जंजिरा.रायगड
9130766065



🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶











*अमृत महोत्सवी तिरंगा*


सलाम आहे त्या वीरांना, ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला
अमृत महोत्सवी तिरंगा, वीरांच्या रक्ताने रंगला ||धृ.||


भारत मातेचा वीर जवान गलवानमध्ये फसला
भ्याड चकमकीत गोळीचा वार त्याने छातीवर झेलला
पुलवामा खोऱ्यात हल्ले झेलत, आसाम सीमेवर लढला
अमृत महोत्सवी तिरंगा, वीरांच्या रक्ताने रंगला ||१||


भाग्यशाली आहे आई जिच्यापोटी वीर जवान जन्मला
कौतुक करुनी मुलाचे या जगी बाप तो दमला
भरत यदुवंशी विरांमुळे हा देश अखंड राहिला
अमृत महोत्सवी तिरंगा, वीरांच्या रक्ताने रंगला ||२||


काय ती जिद्द, त्याग नी निष्ठा तुम्हा वाचून कळला
प्राण पणाला लावून लढला मर्द वीर मावला
किर्ती ऐकूनी तुजप्रती जन हा जय जवान बोलला
अमृत महोत्सवी तिरंगा, वीरांच्या रक्ताने रंगला ||३||


ना धर्माच्या नावावर जगला, ना धर्माच्या नावावर मेला
देश एकच धर्म मानोनी, फक्त देशासाठी लढला
नाती सारी विसरून तीन रंगाच्या तिरंग्यात दंगला
अमृत महोत्सवी तिरंगा, वीरांच्या रक्ताने रंगला ||४||


भारतीय वीरांच्या श्वासामुळे उत्सव आज आभाळी सजला
आयुष्य लागो अनंत विरांस, प्रार्थना तुज चरणी विठ्ठला
नतमस्तक त्या वीरांसाठी, ज्यांनी भारतदेश घडविला
अमृत महोत्सवी तिरंगा, वीरांच्या रक्ताने रंगला ||५||


कवी : किरण अनंत घरत
मु. भेंडखळ, पो. जे.एन.पी.टी.,
ता. उरण, जि. रायगड ४००७०२
संपर्क : ९००४७५५६५५

🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶


*भारतमाते*

भारतमाते तुजसाठीच
मागेन जन्म पुन्हापुन्हा,
रक्षिण्या तव सन्मान अन्
फेडण्यातें तुझिया ऋणा…

लावीन तव मंदीरी मी
धूप असा गं श्वासांचा,
नयनांच्या या ज्योतींनी
चढविन साज पंचप्राणांचा….

देहदीप हा जाळूनिया
सुगंध उधळील कर्माचा,
तुझ्या ललाटी लावीन माते
टिळा शत्रुच्या रूधीराचा….

पुण्यभूमी तू,मातृभूमी तू
मज तुझा गे अभिमान,
करकमलांचा हार घालूनी
देईन तुजस्तव बलिदान…..

आरती डिंगोरे.
नाशिक


🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶


*सोतंत्र्याचा अमरुत मोहोत्सव*

बग कसा तिरंगा,डौलाशी डोलतंय
आमचे घरावं तिरंगा,सोभाग्य आमचा संगतय ||

सोतंत्र्याचा अमरुत मोहोत्सव, चला साजरा करु
ज्यांन्वी ज्यांन्वी बलिदान केला,त्यांची आठवन करु करु||

तरनी ताठी पोरा,आपलेसाटी फासावं चरली
कती कती आया बयनीशी,इंग्रजाना नरली ||

कती तरी जनांवी त्यांचा संसार,आपलेसाटी सोरला
राजे,म्हाराजे,संत,म्हापुरुष
सादी भोली मानूसपुन देशासाटी लऱ्हला ||

फुकाट नाय भेटला सोतंत्र,याची आठवन करु
सोत्ंत्र टिकवाची आपली जबाबदारी त्याचा जतन करु ||

सोतंत्र्याचा अमरुत मोहोत्सव,
चला साजरा करु
ज्यांन्वी ज्यांन्वी बलिदान केला,त्यांची आठवन करु करु||
©®गिरीश दादाभाई म्हात्रे
अंजुर दिवे भिवंडी
९२७०७०१११२

🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶


*चारोळी*

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून
दरवर्षी आनंदाने साजरा करतो
झेंडा फडकावून सलामी देत
शहीद सैनिकांना सर्वजण स्मरतो

*सचिन शंकर पाटील*
*(अलिबाग)*




🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶




*शीर्षक :- तिरंगा*

*स्वातंत्र्य देउनी हा, फडके असा तिरंगा*
*ह्रुदयात भारताच्या, झळके असा तिरंगा*

*भाषा नि धर्म, जाती, असती इथे निराळ्या*
*एकीत या दिसे हा, हटके असा तिरंगा*

*देशाभिमान वाढे, खेळांत भारताचा*
*पदकांत जिंकलेल्या, चमके असा तिरंगा*

*देशात रक्षणाच्या, नाही कसूर केव्हा*
*शौर्यात सैनिकांच्या, धडके असा तिरंगा*

*पडता नजर कुणाची, स्वातंत्र्यदेवतेवर*
*गुंडाळुनी कफन हा,भडके असा तिरंगा*

सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.


🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶

🇮 *तिरंगा* 🇮

*भारावून गेला मनाला*
*जल्लोष स्वातंत्र्याचा*

*सर्वांना सुखावून गेला*
*सोहळा आनंदाचा*

*स्वांतंत्र्य वीरांच्या बलिदानाला*
*रंग केशरी जाज्वल्य देशभक्तीचा!*

*सुख,शांती, सत्याच्या मार्गाला*
*पांढरा रंग शांततेचा!*

*सुख समृध्दीच्या प्रतीकाला*
*हिरवाईचा रंग सजला*!

*निळाईच्या अशोकचक्राला*
*साज निधर्मी राष्ट्राचा*!

*तिरंगा डौलाने फडकला*
*सन्मान समर गाथेचा*

*सह्याद्री कन्या*
*डॉ.शीतल शिवराज मालुसरे*
*महाड-रायगड*


🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶


*॥ऐरणीवरच्या ठिणग्या॥*

*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

*स्वातंत्र्य आंदोलनात*
वंदे मातरम, म्हणत सत्याग्रही
लाठ्याकाठ्या झेलत होते
‘इन्कलाब जिंदाबाद!’ म्हणत
क्रांतीकारक फाशी चढत होते.
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

*परदेशी मालाच्या* दुकांनासमोर
सत्याग्रही निदर्शने करीत होते
परदेशी मालाच्या मोटारीपुढे निजून
बाबू गेनू हुतात्मा झाले होते
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करीत होते?*

*छोडो भारत आंदोलनात*
शिरीश कुमार आणि त्याचे शाळकरी सवंगडी
तिरंगा घेऊन हाती
वंदेमातरम् म्हणत
छातीवर गोळ्या झेलत होते
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करीत होते?*

*सुभाष बाबू नि आझाद हिंद सेना*
देशाच्या ईशान्य सीमेवर
धडका देत होते
त्याच्या खांद्याला खांदा लावून
जपानी सैन्यही
आपल्या स्वातंत्र्यासाठी
प्राणाची बाजी लावून लढत होते
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

*लाल किल्ल्यात*
आझाद हिंद सेनेच्या अधिका-यांवर
खटला सुरु होता
त्याविरोधात देशभर
जोरदार निदर्शने सुरु होती
कलकत्याच्या रस्त्यावर
लाखो तरुण रात्रंदिन
ठिय्या मांडून बसले होते
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

*समाजवादी नेते*
*भूमिगत होऊन*
*रेडिओ केंद्र चालवत होते*
प्रचारप्रसार करत
बेचाळीसच्या चळवळीत
प्राण फुंकत होते
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

*जवळच साता-यात*
*क्रांतीसिंह नाना पाटील*
*’पत्री सरकार’ चालवत होते*
शिवरायांचा कित्ता गिरवत होते
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करीत होते?*

*फाळणीच्यावेळी दंगली शमवण्यासाठी*
*गांधी स्वतःचा जीव धोक्यात घालून*
*वणवण हिंडत होते*
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

*दंग्यात बळी पडलेल्यांची*
*दिल्लीच्या रस्त्यावरची*
*बेवारस प्रेतं*
*लेडी माउंट बॅटन उचलित होती*
पंजाबात बेवारस प्रेतांच्या
सामुदायिक अंत्यविधीसाठी
सोल्जर घरोघरी जाऊन
अश्वत्थाम्यासारखे रॉकेल मागत होते
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

*स्वातंत्र्यदिनी सरकार*
शाळाशाळात देशभर
मिठाई वाटत होते
लोक आनंदोत्सव साजरा करत होते
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

*गांधी हत्येनंतर अवघा देश*
*शोकसागरात बुडाला होता*
कानाकोपऱ्यातून जगाच्या
शोकसंदेश येत होते
दु:खद प्रसंगी परकेही
दु:खात सहभागी झाले होते
*तुम्ही तर घरातलेच होते*
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

*प्रत्येक ठिकाणी जरी नाही*
*कुठेना कुठे तरी*
तुमची हजेरी कशी दिसली नाही.
या धगधगत्या पर्वाची
साधी धगही तुम्हाला
कशी जाणवली नाही
पूलाखालून एवढे पाणी वाहून गेले
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

*सत्तेवर आल्यापासून येताजाता*
सैन्य सीमेवर लढते आहे
हे एकच तुणतुणं तुम्ही वाजवताहेत
गेली साठ वर्षे सैन्य
सीमेवर काय झोपा काढत होते?

*देश स्वतंत्र झाला तेव्हापासून*
सैन्य सीमेवर लढत आहे
चीनी पाकिस्तानी आक्रमण,
आणि बांगला देश युद्धातही
सैन्य सीमेवर लढत होते
मर्दुमकी गाजवत होते
त्यांच्या मदतीसाठी माताभगिनी
अंगावरचे दागिने काढून देत होत्या
सैन्याला पुरेसा तांदुळ मिळावा म्हणून
लोक भात खाणे वर्ज्य करत होते
*तेव्हा तुम्ही काय करत होते?*

*अपघाताने सत्ता मिळताच*
देशभक्तीचं उसनं अवसान
तुम्हाला आलं कुठून?
स्वतःच्या खात्यावर देशभक्तीचं
शून्य क्रेडीट असताना
लोकांच्या देशभक्तीची
उठाठेव करायचं
धाडस आलं कोठून?
तुम्हाला इतिहासाचं विस्मरण झालं तरी
ज्यांच्या पूर्वजांनी देशासाठी
लाठ्याकाठ्या झेलल्या
रक्त सांडलं
ते इतिहास कसा विसरतील
ते तुम्हाला जाब विचारणारच
आमचे बापदादे जेव्हा इतिहास घडवत होते
*तेव्हा ‘तुम्ही’ काय करत होते?*

काय करत होते?
काय करत होते??
काय करत होते???

– *सुभाषचंद्र सोनार,राजगुरुनगर.*
*दि. २९.११.२०१६*
*( रिपोस्ट दि.०९.०८.२०२२ )*


🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶


*।। स्वातंत्र्यदिन ।।*

पंधरा ऑगस्ट । स्वतंत्रता दिन ।
राष्ट्रीय तो सण । भारताचा ।।१।।

स्वतंत्र जाहली । ही भारतमाता ।
गेली परसत्ता । कायमची ।।२।।

कैक क्रांतिकारी । लढले झुंजले ।
तेव्हा प्राप्त झाले । स्वातंत्र्य हे ।।३।।

कित्येके लाविले । संसार पणास ।
वाहिले देशास । जीव सुद्धा ।।४।।

उपभोग घेतो । आम्ही सारेजण ।
कैसे फिटे ऋण । सेनानींचे ।।५।।

जाणीव तयांची । मनी असू द्यावी ।
स्मृती ती ठेवावी । नेहमीच ।।६।।

पंचाहत्तरावे । वर्ष स्वातंत्र्याचे ।
नसती पूर्वीचे । हाल आता ।।७।।

अमृत उत्सव । दिसेल जगता ।
झेंडा फडकता । घरोघरी ।।

देश घेई आता । गगन भरारी ।
होत जाई भारी । जगामध्ये ।।८।।

ऐशा या राष्ट्राचा । असे अभिमान ।
विश्वात महान । देश माझा ।।९।।

*****************************
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने…
©️ श्री.प्रविण म्हात्रे , पनवेल, रायगड

🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶


*तिरंगा..*



उंच गगनी तिरंगा राहो फडकत
चला होऊ सारे, तिरंग्याला नत
देशासाठी लढू, देशासाठी मरू
वाढवू स्वकर्मे या देशाची पत !! धृ !!

स्वातंत्र्य मिळाले सांडवूनी रक्त
शहीद जाहले या देशाचे भक्त !
तिरंगा साठवू अपुल्या नयनी
जय हिंदची राहो अपुल्या वदनी !
येण्या स्वर्ण दिन राबूया सतत
वाढवू स्वकर्मे या देशाची पत !!१!!

वाचू संविधान, जाणू सारे हक्क
होईल अवघे, हे विश्व ही थक्क !
देशाचे गाऊया, देशाचे खाऊया
सारे मिळूनिया, शिखरी जाऊया !
भारतीय सारे, होऊ एकमत
वाढवू स्वकर्मे या देशाची पत !!२!!

सूर्यासम तेज, लाभो भारतास
संताचा सर्वांना, मिळो सहवास !
व्यसन त्यागावे, सत्मार्ग जोडावे
सारे भारतीय, स्वानंदे रहावे !
एकमेका करू, सद्भावे मदत
वाढवू स्वकर्मे, या देशाची पत !!३!!


©️®️शब्दसखा- अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो…८८०५८३६२०७


🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶

*~~ डौले ‘तिरंगा’ थाटात~~*

भारताचे गुण गाता, फुलते ही छाती
डौले ‘तिरंगा’ थाटात, साऱ्यांच्याच हाती ।।धृ।।

शिवराय इथलेच, इथलीच राणी
गुरू गोविंदा सोबती, कबिरांची वाणी
नामा, जना, ज्ञाना झाले, इथे थोर संत
त्याच भूमीत जन्मलो, आम्ही भाग्यवंत

तुकोबांची गाथा सांगे, तू माझा सांगाती ।।१।।

भीमराव लिहितात, न्यारे संविधान
देऊ सारे मनोभावे, कायद्यास मान
लतादीदी गाती जणू, कोकिळेचं गाणं
सतावतं ए पी जेंचं, अकालीच जाणं

मैत्रीत सांगावी कृष्णा, सुदाम्याची नाती ।।२।।

कन्याकुमारी पासून, हिमालयी जाऊ
आरती नमाज सारे, एकसुरी गाऊ
होळी, बैसाखी, दिवाळी, गणपती येता
गोडी वाढते म्हणती, तिळगुळ देता

सुखाने नांदती येथे, विविधांगी जाती ।।३।।

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो – ८८७९८९७७९७



🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶




*स्वातंत्र्याचे गान*

सारे मिळूनी आज गाऊया, स्वातंत्र्याचे गान |
रुधिर सांडले वेदीवरती ठेवू तयांचे भान ||धृ||

पाश तोडोनि परदास्याचे, बंधमुक्त हे पुत्र भूमीचे |
स्वतंत्र पक्षी गगन विहारी,गाणे गाती आनंदाचे |
जपु स्वातंत्र्य हे, राखुनि इथल्या मातीशी इमान |
सारे मिळूनि आज गाऊया——–||१||

जात-पातीची गाडुनि भुते, माणुसकीची गाऊ गीते |
प्रीतीने भरली हदये,खंत नच जरी खिसे रिते |
कष्टाची खाऊनि भाकर, देवू सुखाची तान |
सारे मिळूनि आज गाऊया——–||२||

नकोत प्रतिमा नकोत पुतळे, जपु तयांचे थोर विचार |
दान-त्याग ही आभुषणे आपुली, करु तयांचा पूर्ण स्वीकार |
झिजले जे होवोनि चंदन ठेवू तयांचा मान |
सारे मिळूनि आज गाऊया——–||३||

प्रकाश राजोपाध्ये खोपोली.




🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶🇬🇶




*तिरंगा बनके लहरा करें*


देखो आज आसमान से, मेरे प्यारे वतन को,
तीन रंगोंमे खील रहे, मेरे प्यारे हिंदोस्तान को ¶

मुघल आया, आदिल आया, आया अत्याचारी ब्रिटीश भी,
गोलीयों को देकर सिना, खेली खून की होली भी ¶

अब देखो गौर से आसमानमें भी, ऐ मेरे देशवासियों,
तेज बरसाते आझादिके, उन क्रांतिकारी तारों को ¶

आझादीके इस अमृतमहोत्सवमें, इन विरोंका हम स्मरण करें,
मेरे भारत का हर कणकण अब, तिरंगा बनके लहरा करें ¶
तिरंगा बनके लहरा करें ¶


….डाॕ.संजीव म्हात्रे. खोपटे-उरण

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.