सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत उपविभागीय पोलीस ठाणे यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या कर्जत, नेरळ आणि माथेरान अश्या तीन पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने कर्जत मध्ये स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौड चे आयोजन करण्यात आले होते.
कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या दौड चे उदघाटन करण्यात आले, याप्रसंगी कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, नायब तहसिलदार सोपान बाचकर,नायब तहसिलदार सचिन राऊत, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, वनविभागाचे प्रदिप चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के. मोरे,कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, कर्जत चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे आदी उपस्थित होते.

दहीवली येथील ललानी रोड येथून स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौडला सुरुवात झाली, या दौड मध्ये अभिनव ज्ञान मंदिर शाळाचे विद्यार्थी, कर्जत इंग्लिश मिडीयम स्कूल विद्यार्थी, अभिनव ज्ञान मंदिर महाविद्यालय विद्यार्थी, देवा अकॅडमीचे विद्यार्थी तसेच पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, नागरिक सहभागी झाले होते, ही दौड आमराई सुरभी ज्वेलर्स मार्गे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,बाजार पेठ, मुख्य बाजारपेठ मधून समारोपसाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात आली.
त्याठिकाणी देशपर गीते प्रज्ञा अभंगे, पंकज सोलंकी यांनी सादर केली. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत, अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने आपल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या महापुरुषांचे विचारांचे चिंतन करण्याची ही वेळ असून आपण त्याचा बोध घेतला पाहिजे, त्या संदर्भात जागृती व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम साजरा करण्याचा आपला मुख्य उद्देश आहे असे सांगून समाजाच्या सर्व घटकापर्यंत हा संदेश पोहचला पाहिजे,समाजातील शेवटचा घटक किंवा सामान्य माणूस हा केंद्रस्थानी मानून शासनाची मुख्य संकल्पना आहे की हर घर तिरंगा हा पोहोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

आमदार महेंद्र थोरवे यांनी देशभरामध्ये स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा होत आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळवून 15 ऑगस्ट 2022 ला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या एकत्रपणे याचे आयोजन करण्यात आले आहे, हर घर में तिरंगा घरोघरी तिरंगा ही संकल्पना पंतप्रधान मोदी संपूर्ण देशभरामध्ये आज 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे, स्वातंत्र्याचा रक्तरंजित इतिहासाचे आपल्याला स्मरण व्हावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचा आयोजन होत असताना या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या कुटुंबावर आपल्या आयुष्यावर तुळशीपत्र वाहून या देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन हा देश स्वातंत्र ठेवण्यासाठी जे महान कार्य केले आहे, त्यामुळेच आज आपण या देशांमध्ये मुक्तपणे फिरतात दिसत आहोत, या स्वातंत्र्यवीरांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये त्याचे स्मरण आजच्या युवा पिढीला व्हावे, या देशाचे उज्वल भविष्य म्हणून आपल्याकडे पाहिले जात आहे म्हणून यासाठीच हर घर मे तिरंगा ही संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशात राबविली आहे असे सांगितले, संपूर्ण कर्जत शहरांमध्ये फिरत असताना प्रत्येक ठिकाणी पाहिलं की घराच्या बाहेर त्या त्या ठिकाणी हा तिरंगा फडकवण्यात आलेला आहे हे फार अभिमानाची गोष्ट आहे की या राष्ट्रध्वजाचा सन्मान आपण सगळ्यांनी राखला पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप गोगटे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांनी केले, राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची समारोप करण्यात आला.








Be First to Comment