Press "Enter" to skip to content

पनवेल – वावंजे रस्त्याची दुरवस्था

वावंजे रस्ता दुरुस्तीसाठी सरपंच डी बि म्हात्रे आक्रमक : अपघातांना निमंत्रण देणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा 

सिटी बेल ∆ वावंजे ∆

तळोजे औद्योगिक वसाहतीमधून वावंजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसाळ्यात अक्षरशः दैना उडते. गेली ५ ते ६ वर्षे वावंजे सरपंच स्वखर्चातून या रस्त्याची डागडुजी करत असतात. रस्ता दुरुस्तीची जाबाबदारी पनवेल महानगरपालिका आणि  एम आय डी सी यांची आहे. ही  दोन्ही आस्थापने एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. अनेक अपघातांना आमंत्रण देणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वावंजे सरपंच डी  बी म्हात्रे यांनी दिला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती देताना सरपंच डी बी म्हात्रे म्हणाले की, डोंगर रांगांमध्ये होणाऱ्या पावसाचे पाणी वाहून आणणारा नाला हे खरे या समस्येचे मूळ आहे. सदरचा नाला जर का व्यवस्थित बांधला आणि त्याला खोली आणि रुंदी प्रदान केली तर तो पाणी व्यवस्थितपणे वाहून घेऊन जाईल आणि हम रस्त्यावर पाण्याचा साठा होणार नाही. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होतो तसेच या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ असल्याकारणाने त्याला खड्डे पडतात. दोन्ही आस्थापनांकडे आम्ही वारंवार तक्रार अर्ज करत असतो त्याचा पाठपुरावा देखील करत असतो परंतु केवळ इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे हे काम मार्गी लागत नाही. येथे अनेक अपघात झालेले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेची रिक्षेतच प्रसूती झाली यापेक्षा आणखीन भयंकर घटना दुसरी कुठली असेल ?

पावसाळी नाल्याचे बांधकाम करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही तर आम्हाला आमच्या स्टाईलने आंदोलन करून ही समस्या सोडवावी लागेल.

रस्त्याची डागडुजी करण्यास असमर्थ असणाऱ्या महानगरपालिकेवर टीकेचा आसूड ओढताना वावांजे विभागीय चिटणीस मच्छिंद्र पाटील म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. वावंजे ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. गरज नसताना या मुद्द्याचे राजकीय भांडवल करून पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधारी येथील जनतेला वेठीस करत आहेत.

प्रसिद्धी माध्यमांना या समस्येबाबत अवगत करताना ववांजे ग्रामपंचायतींचे सरपंच डी बी म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे विभागीय चिटणीस मच्छिंद्र पाटील,विद्यमान उपसरपंच जिनेश पाटील. माजी उपसरपंच एम बी पाटील, चंद्रकांत पाटील आदी मान्यवरांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.