खीडुक पाडा ग्रामस्थांना मिळणार मूलभूत सुविधा : प्रभुदास भोईर यांच्या पाठपुराव्याला आले यश
सिटी बेल ∆ पनवेल ∆
प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मिनारायण सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.खीडुक पाडा ग्रामस्थांना रस्ते,पिण्याचे पाणी, सांडपाणी वाहून देणाऱ्या वाहिन्या, सार्वजनिक आरोग्य सुविधा, स्मशानभूमी या सेवा सुविधा मिळणे दुरापास्त झाले होते. एक ऑक्टोबर 2016 रोजी पनवेल महानगरपालिकेत अंतर्भूत झाल्यानंतर देखील या गावात विकास कामे फारशी झालीच नाहीत. त्यातच गावासभोवताली असणारे रस्ते जे लोखंड व पोलाद बाजार समितीच्या आखत्यारित येतात, त्यांची अक्षरशः चाळण झाली होती.
ग्रामस्थांना मूलभूत सुविधा अनेकदा मागणी करून देखील मिळत नसल्यामुळे अखेरीस प्रभुदास भोईर यांनी रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यामुळे गावाच्या सभोवतालचे रस्ते करून देण्यास लोखंड व पोलाद बाजार समिती राजी झाली. गावाच्या अंतर्गत सेवा सुविधांसाठी प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली.
सदर बैठकीमध्ये आयुक्तांनी पालिकेअंतर्गत येणाऱ्या गावांसाठी १७७ करोड रुपये राखिव विकास निधी मधुन खिडुकपाडा गावाकरीता निधी वापरण्याचे मंजुर करुन तसे लेखी देण्याचे आश्वासन दिले.यामध्ये प्रामुख्याने गावातिल अंतर्गत रस्यांचे काँक्रीटीकरण, पाण्याची जुनी पाईपलाइन बदलणे, गटारे, सांडपाण्याची गटारे, स्ट्रीट लाईटची डागडुजी, शाळा दुरुस्ती संदर्भातील कामे, व्यायामशाळा, स्मशानभुमीची डागडुजी या सुविधा गावकऱ्यांना मिळणार आहेत.
आयुक्त गणेश देशमुख यांना मागण्यांचे निवेदन लेखी स्वरूपात देतेवेळी प्रभुदास भोईर यांच्या समवेत पमपा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश नारायण भोईर, दीपक गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड, गणेश सिताराम भोईर,देवदास भोईर,गुरुनाथ ठाकूर, प्रभाकर उलवेकर, धनंजय भोईर यांची उपस्थिती होती.








Be First to Comment