Press "Enter" to skip to content

४८ तासात रस्ते दुरुस्तीच्या कामांना होणार प्रारंभ

प्रभुदास भोईर यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन वठणीवर : खिडूकपाड्याचा वनवास संपणार

सिटी बेल ∆ कळंबोली ∆

खिडूकपाडा ग्रामस्थांना सोयी सुविधांच्या अभावामुळे अनेक जाच सहन करावे लागत आहेत. गावाबाहेरील आणि गावाच्या आतील रस्त्यांची भयावह परिस्थिती ही एक अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. अनेकदा विनंती करून देखील रस्त्यांची काम होत नसल्याने प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांना रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले होते. त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत लोखंड व पोलाद बाजार समिती तसेच सिडको यांनी तातडीने रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेणार असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करत असल्याचे जाहीर केले. सदरच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सिडको, लोखंड व पोलाद बाजार समिती आणि खिडुक पाडा ग्रामस्थ यांच्या दरम्यान बैठक आयोजित केली होती. या दोन्ही आस्थापनांनी आम्हास रस्ते उपलब्ध करून दिल्यास आम्हाला आंदोलनाची गरज भासणार नाही अशी प्रतिक्रिया प्रभुदास भोईर यांनी बैठकीनंतर व्यक्त केली.

शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेल चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य माथाडी अँड जनरल कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी 17 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करून लोखंड व पोलाद बाजारातील वाहतूक पूर्णपणे थांबविण्याचा इशारा दिला होता. कळंबोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी संबंधित आस्थापनांना आणि ग्रामस्थांना बैठकीसाठी पाचारण करून समस्यांवर तोडगा काढण्याचे कामी महत्वाचा पुढाकार घेतला.

या बैठकीला सिडकोचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर प्रकाश मोहिले, त्यांचे सहकारी बनकर, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन लोखंड व पोलाद बाजार समितीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ए के श्रीवास्तव उपस्थित होते. प्रभुदास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ मंडळाचे शिष्टमंडळ चर्चा करण्यासाठी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश नारायण भोईर
दीपक गोंधळी,सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड,गणेश सिताराम भोईर,देवदास भोईर,गुरुनाथ ठाकूर,प्रभाकर उलवेकर, धनंजय भोईर यांची उपस्थिती होती.

या बैठकीपूर्वी प्रभुदास भोईर यांनी ग्रामस्थ शिष्टमंडळासोबत लोखंड व पोलाद बाजाराचे चेअरमन यांच्यासोबत विस्तृत चर्चा करून त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. लोखंड व पोलाद बाजार समितीच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यावरून स्मशानभूमीमध्ये प्रेतयात्रा देखील नेता येत नाही ही अत्यंत जळजळीत खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच रुग्णवाहिकेतून देखील प्रेत स्मशानभूमी मध्ये नेता येत नाही कारण अत्यंत भयंकर अवस्थांमध्ये असणाऱ्या रस्त्यांवरून कुठलाही रुग्णवाहिका चालक त्याची गाडी चालवण्यासाठी धजावत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.