Press "Enter" to skip to content

आरोग्य शिबिरात अनेकांची व्याधी मुक्ती

कर्जत प्रेस क्लब च्या वतीने मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर आणि मोफत औषधे वाटप समारंभाचे आयोजन

आयुर्वेद म्हणजे भारतीयांची खरी ओळख आहे : सुरेखा भणगे

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

‘आयुर्वेद हे प्राचीन काळापासून आहे. त्याचे महत्व आपल्यापेक्षा पाश्चिमात्य देशांना जास्त आहे. ते त्याचा अभ्यास करीत आहेत. आयुर्वेदाच्या उपचाराने रोग मुळापासून निघून जातो. खरे तर आयुर्वेद ही भारतीयांची खरी ओळख आहे. ग्रामीण भागात गावांच्या आजूबाजूलाच वनौषधी आहेत त्या तेथील लोकांना माहीत नसते. त्याची माहिती त्यांना करून दिल्यास अनेक व्याधींची मुक्ती होईल’ असा विश्वास कर्जत व माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी व्यक्त केला. कर्जत प्रेस क्लब च्या वतीने स्व. निर्मला देशमुख यांच्या स्मरणार्थ तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान, नारी सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर आणि मोफत औषधे वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ज्योविस आयुर्वेद दादर मुंबईचे विशेष सहकार्य लाभले होते.

आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा शिबिराचे व मोफत औषधे वाटप समारंभाचे आयोजन पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठा मध्ये करण्यात आले होते. सुरेखा भणगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. मनोहर साबणे, ज्योविस आयुर्वेदाचे डॉ. राज सातपुते, डॉ. ज्योती सातपुते, रुग्ण सन्मित्र यशवंत गोरे, तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे, डॉ. सोनाली घाणेकर, अस्मिता सावंत, ऍड. राजेंद्र निगुडकर, महेंद्र निगुडकर आदी उपस्थित होते.

कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष ऍड. राहुल देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागतपर मनोगतात शिबिराचा उद्देश सांगताना आईच्या आठवणीने कंठ दाटून आला. यानंतर डॉ. राज सातपुते, यशवंत गोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुकेश सुर्वे यांनी माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्या आठवणींना उजाळा देऊन ‘त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून त्यासाठी तुमचे सर्वांचे सहकार्य हवे आहे.’ अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ. मनोहर साबणे यांनी, ‘मी जरी ॲलोपॅथी पद्धतीने उपचार करीत असलो तरी आयुर्वेदिक उपचार पद्धती श्रेष्ठ आहे. आजार होऊ नये यासाठी आयुर्वेद उत्तम आहे. त्याचा प्रसार करणे आवश्यक आहे.’ असे सांगितले. यशवंत गोरे यांनी, ‘मी माझ्या परीने रानातील वनौषधी आणून अनेकांच्या व्याधी बऱ्या करीत आहे. त्याचे मानसिक समाधान मला मिळते.’ असे स्पष्ट केले. डॉ. राज सातपुते यांनी आयुर्वेदाचे महत्व सांगून आयुर्वेदिक उपचाराने उशिरा परिणाम दिसतात हा गैरसमज असून काही व्याधींवर योग्य उपचार केल्यास एका मिनिटात त्याचा परिणाम होतो हे आज अनेकांना अनुभवास मिळणार आहे.’ असे स्पष्टपणे सांगितले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष विलास श्रीखंडे तर आभार प्रदर्शन खजिनदार मल्हार पवार यांनी केले.

त्यानंतर ज्योविस आयुर्वेदाच्या डॉ. ज्योती सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीला सुरुवात झाली. अनेकांच्या चामखिळ्या व भवऱ्या लगेचच काढण्यात आल्या. काहींचे खांदे असल्याने त्यांचे हॅट वर जात नव्हते तर काहींच्या गुढगे दुखत असल्याने त्यांना नीट चालता येत नव्हते. डॉ. राज यांनी अग्नी कर्म व रक्त मोक्षण करून त्यांच्या व्याधी कमी केल्याने त्यांना चांगलाच आराम मिळाला. एका मुक्या महिलेचे खांदे दुखीमुळे हात वर जात नव्हते व मानही दुखत होती. तिच्या वेदना अग्नी कर्म करून काही मिनिटात कमी झाल्या व हात वर जाताच तिने डॉ. राज यांनी वरच्या वर जोरात टाळी दिली. त्यावेळी अनेकांनी टाळ्या वाजवून आंनद व्यक्त केला. या शिबिरात ज्योविस आयुर्वेदाच्या वीस जणांच्या टीमने सुमारे दोनशे जणांची तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनंदा कांगणे, श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष रंजन दातार, मनीषा सुर्वे, ज्योती पाटील, पूजा सुर्वे, नितीन दगडे, तानाजी पाटील, अजय गायकवाड, ज्ञानेश्वर बागडे, भूषण प्रधान, पद्मजा देशमुख, आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.