
योगाला जागतिक ओळख मिळवून देण्यात पंतप्रधान मोदींचे मोठे योगदान – आमदार विक्रांत पाटील
पनवेल, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने वडाळे तलाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमात विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी सहभाग घेत नागरिकांसमवेत योगाभ्यास केला. यावेळी त्यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी आणि संतुलित जीवनासाठी नियमित योगाभ्यासाची गरज व्यक्त केली.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार विक्रांत पाटील म्हणाले की, योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक आरोग्यही सुदृढ राहण्यास मदत होते. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे योगाला जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळाली असून संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात योगाबाबत जागरूकता वाढली आहे. आज अनेक देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य वारसा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवून निरोगी, सकारात्मक आणि तणावमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिलाताई पाटील, महिला व बालकल्याण सभापती नगरसेविका ममता म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, नगरसेविका स्नेहलताई ढमाले-पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, उपायुक्त वैभव विधाते यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
योग दिन कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Be First to Comment