प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाखाली खिडुक पाडा येथील ग्रामस्थ करणार १७ ऑगस्ट ला रास्ता रोको आंदोलन
सिटी बेल ∆ कळंबोली ∆
खिडुक पाडा येथील ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून आज देखील वंचित आहेत.सिडको ने भू संपादन केलेल्या येथील ग्रामस्थांच्या जमिनीवर आशिया खंडातील सगळ्यात मोठे पोलाद मार्केट निर्माण करण्यात आले आहे. असे असले तरी देखील या गावात प्रवेश करण्याचा एक सुद्धा रस्ता सुस्थितीत नाही. अनेक वेळा पत्र व्यवहार करून देखील पदरी केवळ पोकळ आश्वासन पडल्यामुळे आता ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे म्हणूनच १७ ऑगस्ट रोजी तमाम खिडूक पाडा ग्रामस्थ पोलाद मार्केट मधील रस्त्यांवर चक्काजाम आंदोलन करणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य माथाडी अँड जनरल कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचे बाबत प्रभुदास भोईर यांनी मंगळवार दिनांक 26 जुलै रोजी प्रसिद्धी माध्यमांशी सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले की सिडको ने आमच्या गावाला पंखाखाली घेतले तरी देखील कुठलीही सुविधा आजपर्यंत बहाल केलेली नाही. आज स्मशानभूमी रायगड जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी जाण्यासाठी गुडघाभर चिखलातून वाट काढत जावे लागते. गावात प्रवेश करण्यासाठी एक सुद्धा धड रस्ता शिल्लक राहिलेला नाही.

रस्ते बनविण्याच्या बाबत सिडको प्रशासन आणि मार्केट कमिटी एकमेकांकडे बोट दाखवतात. मार्केट कमिटी त्यांची उत्पन्न देणारी आस्थापने ज्या रस्त्यांवरती आहेत त्याच रस्त्यांवरती कामे करते. पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कामांची फाईल आज पण पुढे सरत नाही हे समजल्यानंतर तर आम्हाला अत्यंत वाईट वाटते. सिडको आम्हाला अक्षरशः सावत्र मुलाप्रमाणे वागणूक देत आहे. चिखल आणि खड्ड्यांतून ग्रामस्थांना वाट काढावी लागते. लहान मुले ज्येष्ठ नागरिक आजारी रुग्ण यांना आशा चाळण झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना भरपूर त्रास होतो. स्मशान भूमी कडे जाणारा रस्ता इतक्या भयंकर परिस्थितीत आहे की चार खांदेकरी तिरडी घेऊन जाऊ शकत नाहीत. अंत्यविधीसाठी एखाद्या रुग्णवाहिकेत बोलावल्यास आमच्या गावाचे नाव ऐकून तो धूम पसार होतो. ही सगळी अत्यंत हलाखीची परिस्थिती सिडको आणि मार्केट कमिटी यांच्यामुळे निर्माण झाली आहे. आता पत्रव्यवहार विनंती असले काही न करता आम्ही थेट रस्त्यावरती उतरणार आहोत आणि आमच्या मूलभूत हक्कांसाठी संविधानिक पद्धतीने आंदोलन करणार आहोत.

प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाखाली १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनामध्ये, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश नारायण भोईर, दीपक गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड, गणेश सिताराम भोईर, देवदास भोईर,गुरुनाथ ठाकूर,प्रभाकर उलवेकर, धनंजय भोईर यांच्यासह अबाल वृद्धांसकट ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.








Be First to Comment