सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ उपक्रम कर्जत नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यासाठी नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून हा उपक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी करण्याचा निर्धार केला.
नगरपरिषदेच्या सभागृहात नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त जनतेच्या मनात लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वतंत्र संग्रामातील अज्ञान नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे समरण व्हावे. तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम ठेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी. या उद्देशाने दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी येत्या दि.11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ‘ हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन केले.
या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष अच्युत कोडगिरे यांनी ‘हा उपक्रम करताना संस्था, विद्यालये आदींनीही बरोबर घ्यावे. आमच्या संस्थेकडून सर्वतोपरी सहकार्य राहील.’ असे आश्वासन दिले. निवृत्त मुख्याध्यापक दामोदर शहासने यांनी, ‘हा उपक्रम करताना निधीची आवश्यकता लाभेल त्यासाठी शहरातील व्यापारी संघटना, दानशूर व्यक्ती, संस्था आदींकडून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करावेत. तसेच दुर्गम भागात वाडी वस्तीवर देखील हा उपक्रम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.’ असे सूचित केले. नगरसेवक बळवंत घुमरे यांनी, ‘राखी पौर्णिमा, दही हंडी आदी सण या कालावधीत येतात. त्यासाठी तिरंगी रंगाचा वापर केल्यास एक वेगळेच महत्व प्राप्त होईल. असे सांगितले.
माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी, ‘आपण स्वातंत्र्याच्या संबंधी अनेक उपक्रम राबवतो परंतु त्यासाठी किती लोकप्रतिनिधी व नगरसेवक उपस्थित राहतात? हे सुद्धा पाहिले पाहिजे. सर्वांनीच सहभाग घेतल्यास स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चांगल्या प्रकारे साजरा होईल.’ असे सांगितले. जितेंद्र ओसवाल यांनी, ‘अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 75 वर्षांवरील नागरिकांचा सन्मान करावा.’ असे सुचविले. विजय मांडे यांनी, ‘आम्ही पत्रकार संघाच्या वतीने गेली 18 वर्षे 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री 12 वाजून 02 मिनिटांनी ध्वजारोहण करतो. या उपक्रमातही आम्ही सहभागी होऊन लागेल ते सहकार्य करू.’ असा शब्द दिला. रोटरी क्लबचे अध्यक्ष सतीश श्रीखंडे यांनी, ‘सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी , ‘ध्वज वाहनांसाठी लागणारे ध्वज नगरपरिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत ध्वजाचा अपमान होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. या कालावधीत विविध समारंभाचे आयोजन करण्यात येईल. त्यासाठी संस्थांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.’ असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन रवींद्र लाड तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी भणगे यांनी केले.
या प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र नातू, कृष्णा लाड, सुरेश कुरतडकर, माजी नगराध्यक्ष रजनी गायकवाड, अश्विनी दिघे, बिनीता घुमरे आदींसह शहरातील विद्यालयांचे शिक्षक, बचत गटाच्या महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







Be First to Comment