Press "Enter" to skip to content

वाढदिवसानिमित्त वृक्षसंवर्धन

ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. भक्तीकुमार दवे यांच्या जन्मदिनाच्या औचीत्याने कार्यकर्ते करणार एक हजार बहुवार्षिक वृक्षांची लागवड

सिटी बेल ∆ पनवेल ∆

काँग्रेस चे ज्येष्ठ नेते तथा पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्ती कुमार दवे यांचा जन्मदिन बुधवार दिनांक १३ जुलै रोजी पनवेलच्या काँग्रेस भवन मध्ये साजरा करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जन्मदिनाच्या औचीत्याने एक हजार बहुवार्षिक वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे.

झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटिव कमिटी चे सन्माननीय सदस्य अभिजीत पाटील यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, वृक्षारोपणासोबत वृक्ष संवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. डॉक्टर भक्ती कुमार दवे यांचा तिथीनुसार जन्मदिन हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी असतो. आमच्यासाठी गुरुस्थानी असणारे डॉक्टर दवे यांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणं हा आमच्या लेखी दुग्ध शर्करा योग आहे. वास्तविक वयाची पंच्याहत्तरी झाल्यानंतर जन्मदिवस साजरे करू नयेत असा आयाम आम्हाला डॉक्टरांनी शिकविला आहे. परंतु डॉक्टरांच्या सूचनेनुसार मार्गक्रमण करणारे माझ्यासारखे कार्यकर्ते मात्र त्यांची ही सूचना न पाळण्यात आनंद मानतात. त्यांनी शतायुषी व्हावे, त्यांना निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं अशी माझी मनोमन सदिच्छा.

त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने आम्ही एक हजार बहुवार्षिक वृक्ष लागवडीचा आणि ते वृक्ष जगविण्याचा संकल्प करत आहोत.यात प्रामुख्याने पेरू, आवळा, जांभूळ, सिताफळ यासारखे फलदायी वृक्ष असतील, तर चिंच,कांचन, बहावा, कारंज , सप्तपर्णी यासारखे पर्यावरण पूरक वृक्ष असतील.

यावेळी काँग्रेस पक्षाच्या न्याय व विधी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष एडवोकेट के एस पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले. तर पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भाई आर सी घरत यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर भक्तीकुमार दवे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवडीच्या केलेल्या संकल्पनेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व या संकल्पनेचे तोंडभरून कौतुक केले.

यावेळी डॉक्टर भक्ती कुमार दवे यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी काँग्रेस पक्षाबरोबरच अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

यावेळी अभिष्टचिंतन सोहळ्याला भाई आर सी घरत,झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटिव कमिटी चे सन्माननीय सदस्य अभिजीत पाटील,अरविंद सावळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुदाम पाटील,पनवेल प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष यशवंत ठाकरे, श्रीकांत बापट, रमेश जानोरकर पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निर्मलाताई म्हात्रे, माजी नगरसेवक तथा पनवेल शहर अध्यक्ष लतीफ शेख,समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक,काँग्रेस पक्षाच्या न्याय व विधी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष एडवोकेट के एस पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष तथा अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमंत्रक डॉक्टर अमित भक्ती कुमार दवे, पनवेल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार दोंदे, पत्रकार साहिल रेळेकर,प्रताप गावंड, एड.कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

आज माझा ७९ वा वाढदिवस माझ्या सर्व मित्रमंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी साजरा केला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आजची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती ही चमत्कारिक आणि गोंधळात टाकणारी आहे. पण मला स्वतःला असे वाटते की लोकशाहीत राजा ही संकल्पना नसते. लोकशाहीत ज्याने समाज शोभुन दिसतो असे विचारवंत लोक, कार्यप्रवण लोक समाजाला शोभुन दिसतात. असे विचारवंत आणि कार्यप्रवण व्यक्ती समाजापासून दूर राहतात की काय, आणि म्हणुन अशी परिस्थिती ओढवते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्तेचा उपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग करण्याकडे जो कल आहे ही वृत्ती कमी व्हावी अशी मी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे राजकारणात किमान समान कार्यक्रमापेक्षा किमान समान तत्वे उपयोगाची आहेत. सर्व राजकीय पक्षाची किमान समान तत्वे सारखीच आहेत, परंतु प्रत्येकाची वागण्याची दिशा वेगवेगळी आहे. त्यामुळे ती तत्वे समाजाच्या हितासाठी एकत्रितपणे वापरण्यात यावी आणि समाजात सौख्य नांदावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो

डॉ. भक्ती कुमार दवे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.