खांदा कॉलनीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा सुरू करा
सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆
खांदा कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा सुरू करणे, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक संनियंत्रीत करण्यासाठी रोज पूर्णवेळ दोन वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त करणेबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अवैध रिक्षा स्टँड अन्य ठिकाणी हलवण्याबाबतची मागणी शेकापचे पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी पोलीस उपायुक्त वाहतूक विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.
खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सिग्नल यंत्रणा बसवलेली आहे. परंतु ती कार्यान्वीत नाही. नेहमी बंदच असते. सदर सिग्नल यंत्रणा तातडीने चालू करणे आवश्यक आहे. खांदा कॉलनी विभागात व्होरायजन स्कूल, महात्मा स्कूल, पिल्लई ग्लोबल अॅकॅडमी, सेंट जोसेफ सीकेटी कॉलेज, आगरी शिक्षण संस्था तसेच नवीन पनवेल येथील जोसेफ स्कूल व डिईव्ही स्कूल या सर्व शाळा मधील शिकणारे विद्यार्थी, स्कूल व्हॅन व पालक या सगळ्यांची याच चौकातून वर्दळ आहे. तसेच नवीन पनवेल येथून येणारे कामगार व नोकरदार या वर्गालाही याच चौकातून हाय वे ला तसेच स्टेशनला जावे लागते. याचा परिणाम म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकात वरील सर्व शाळा भरताना व सूटताना सकाळ, दुपार व सांयकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते.
अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक खांदा कॉलनी येथे विविध आठ ते दहा रस्त्याने वाहने येतात व जातात. त्यातच येथील सिग्नल बंद असल्याने व वाहतूक पोलीस नसल्याने येथे वाहतूक कोंडी निर्माण होऊन रोज तीन ते चार वेळा प्रत्येक वेळी तास दोन तास अभूतपूर्व गोधंळ निर्माण होतो. हे कमी की काय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक खांदा कॉलनी येथे खांदा कॉलनी ते खांदेश्वर स्टेशन कडे जाण्यासाठी व नवीन पनवेल कडे जाण्यासाठी बेकायदेशीर रित्या रिक्षा स्टैंड निर्माण केले आहे. तसेच खांदेश्वर स्टेशनवरून येणाऱ्या शेअर रिक्षातील प्रवाशांना रिक्षाचालक बरोबर या चौकात उतरवतात. याचा परिणाम खांदा कॉलनी चौक ते खांदा कॉलनी हाय वे पर्यंत वाहतूक कोंडी होते.
तरी या समस्येचा गंभीरपणे विचार करून सदर समस्या सोडविण्यासाठी तातडीने पाऊले उचलून सर्व प्रवाशांना व खांदा कॉलनी मधील रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी शेकापचे पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केली आहे.







Be First to Comment