कलोते फाटा ते नडोदे रस्त्याला तलावाचे स्वरूप : रस्ता प्रवासासाठी बनला धोकादायक
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
खालापूर तालुक्यामधील काही भागातील रस्त्याची पहिल्याच पावसात अवस्था अत्यंत बिकट झाल्याने रस्त्यात खड्डे की – खड्ड्यात रस्ते, अशी स्थिती बनली असल्याने नागरिकांबरोबर वाहन चालकामध्ये नाराजी व्यक्त होत असुन कलोते फाटा ते नडोदे या मार्गावरून नागरिकांचा प्रवास धोक्याचा बनला असून या मार्गाला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांसह प्रवासी, वाहन चालक व शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्याच्यामध्ये कमालीची संतापाची लाट पसरली असून त्यांना हा मार्ग धोक्याची घंटा देत असल्याने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
तालुक्यातील काही ठिकाणी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून दररोज कुठेना कुठे तरी छोटे – मोठे अपघात घडत असून दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहन चालकांना व प्रवासी वर्गाना अनेक शारीरिक आजार होत असून काहीना कंबर दुखी, मान दुखी असे असंख्य आजार जडत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्याच्यामध्ये कमालीची नाराजी व्यक्त असून खालापूर तालुक्यातील कलोतेफाटा ते नडोदे या रस्त्याची पहिल्याच पावसात अवस्था अत्यंत बिकट झाली असून डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले. तर मार्गावरून नडोदे, नडोदेवाडी, निगडोली, धारणी, पौद या गावातील शाळकरी विद्यार्थी व नागरिक दररोज प्रवास करीत असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ पाहायला मिळत असून या मार्गाची अवस्था दयनीय झाल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन मोटार सायकल चालकाच्या गाड्या या रस्त्यावरून घसरून वाहन चालकांना दुखापत होत असल्याने त्याच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत .
आताच्या घडीला रस्त्याला डबक्याचे स्वरूप निर्माण झाल्याने या मार्गावरून प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत असून दररोज मोटार सायकल चालक पडण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्व वाहन चालकांसह नागरिकांनामध्ये संताप व्यक्त होत असून लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी. कल्पेश सुर्वे – नडोदे ग्रामपंचायत, सदस्य







Be First to Comment