Press "Enter" to skip to content

आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन

खारघर वसाहतीत मैदान सुशोभिकरण करण्याच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवण्याची शिवसेनेची मागणी

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

खारघर सिडको द्वारे खारघर वसाहतीत उद्यान आणि मैदान विकसित करण्यात आले असताना, सुस्थितीत असलेल्या मैदान आणि उद्यानाचे सुशोभिकरण करण्याच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यात येत आहे. त्यामुळे खारघर मधील मैदान, उद्यान सुशोभिकरणाच्या नावाखाली होणारी उधळपट्टी थांबवावी, अन्यथा सुरु असलेले काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा शिवसेना शिष्टमंडळाने पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या शिष्टमंडळात शिवसेना पदाधिकारी रामचंद्र देवरे, उत्तम मोर्बेकर, संतोष गुजर, अनिस तेली यांच्यासह शिवसैनिकांचा समावेश होता.

खारघर वसाहतीतील रस्त्यांची झालेली दुरवस्था, रहिवाशांना मिळणारे अपुरे पाणी, घंटागाडीतून होणारी गळती, या महत्वाच्या कामासाठी पैसे खर्च करण्याऐवजी खारघर वसाहतीतील सुस्थितीत असलेले मैदान आणि उद्यानाचे सुशोभिकरण करण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. सदर खर्च म्हणजे जनतेच्या पैशाची सरळसरळ उधळपट्टी आहे.

खारघर सेक्टर २ मधील उद्यानात मुले-मुलींना खेळण्यासाठी खेळणी, सुरक्षा रक्षक कॅबिन, हायमास्ट दिवे,खुली व्यायाम शाळा असताना पुन्हा या उद्यानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. खारघर मधील उद्याने सिडकोकडे असताना त्यांची योग्य प्रकारे निगा राखली जात होती. मात्र, महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर उद्यानांची दुरवस्था झाली आहे, असे निवेदनात निदर्शनास आणून, ‘महापालिका आयुक्तांनी सदर उद्यानाची पाहणी करुन गरज असेल तर उद्यान विकसीत करावे’, अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने केली आहे.

दरम्यान, शिवसेना शिष्टमंडळाच्या निवेदनाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यास सुरु असलेले उद्यानाचे काम बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनात शिवसेना शिष्टमंडळाने दिला आहे. खारघर वसाहतीमध्ये ‘सिडको’ने उद्यान आणि मैदान विकसित केलेले असताना पनवेल महापालिकेने गेल्या २० दिवसात खारघर मध्ये अनेक उद्यान आणि मैदानांचे भूमिपूजन केले आहे. मात्र, सदर उद्यान आणि मैदानाचे भूमिपूजन करताना लावण्यात आलेल्या फलकावर उद्यान आणि मैदान विकसित करण्यासाठी किती रक्कम खर्च करण्यात येणार आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे विकसित असलेले उद्यान आणि मैदान पुन्हा विकसित करण्याचे काम कशासाठी काढण्यात आले आहे, अशी चर्चा खारघर मधील नागरिकांमध्ये सुरु आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.