सिटी बेल ∆ पनवेल ∆
पनवेल रेल्वे स्थानकातुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवा सुविधा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या स्टेशन युजर्स कन्सलटेटिव्ह कमिटी ची बैठक सेंट्रल रेल्वे च्या डी सी एम यांच्या सोबत बुधवार दिनांक २२ जून रोजी पार पडली. कमिटी च्या सदस्यांनी प्रावाशांना उद्भवणाऱ्या अडचणी आणि समितीच्या सूचना असणारे निवेदन दिले. यातील अत्यंत जरुरीचे मुद्दे विचारात घेऊन लवकरात लवकर त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन डी सी एम यांनी दिले.

सेंट्रल रेल्वे चे डीव्हीजीनल कमर्शिअल मॅनेजर एम एल मीना यांनी स्टेशन युजर्स कन्सलटेटिव्ह कमिटी च्या सदस्यांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच आगामी काळात होणाऱ्या विकास प्रकल्पाबाबत सदस्यांना अवगत केले. समितीचे उपाध्यक्ष यशवंत ठाकरे यांनी प्रास्ताविक सादर केले.
जनरल सेक्रेटरी श्रीकांत बापट, सहाय्यक सेक्रेटरी निलेश जोशी, रमेश जानोरकर,डॉ.मधुकर आपटे,पत्रकार मंदार दोंदे,विलास दातार,सरीता पाटणकर यांनी प्रवाशांच्या समस्या मांडल्या. यावेळी स्टेशन मास्तर जे पी मीना,सी सी आय ए पी मीना, स्टेशन मास्तर(कमर्शियल) सुधीर कुमार,रेल्वे पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पालवी,आर पी एफ चे राणा,रेल्वेच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
कोरोना काळात बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरु करण्याबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. प्रवाशांच्या साऱ्या समस्या समजून घेतल्यानंतर मीना यांनी स्टेशन युजर्स कन्सलटेटिव्ह कमिटी च्या सूचना आणि तक्रारी वरिष्ठ पातळीवर पाठवणार असून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
पनवेल रेल्वे स्थानकातील चोऱ्यांचे बाबत मुद्दा उपस्थित केला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक पालवी यांनी सध्या फक्त 60 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती दिली तसेच संपूर्ण स्थानक परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणखीन 122 कॅमेऱ्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. आता उपलब्ध असणारे कॅमेरे विद्युत प्रवाह खंडित झाल्यास मर्यादित क्षमतेने काम करतात या गंभीर गोष्टीकडे देखील त्यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.







Be First to Comment