Press "Enter" to skip to content

काँग्रेसचे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन

मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है ! घोषणांनी दणाणले पनवेलचे उपविभागीय अधिकारी कार्यालय

केंद्रीय संस्थांचा वापर करून विरोधकांचा आवाज दडपणाऱ्या भाजपचा काँग्रेसने केला निषेध

सिटी बेल ∆ पनवेल ∆

शुक्रवार दिनांक 17 जून रोजी पनवेलच्या उपविभागीय कार्यालयाचा परिसर भाजप विरोधी घोषणांनी दणाणून गेला. नॅशनल हेरॉल्ड च्या कथित प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकवल्यामुळे देशभरातून निषेधाचा सूर उमटत आहे. पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई आर सी घरत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने शुक्रवारी उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करून भाजपा शासित केंद्र सरकारला सज्जड इशारा दिला.

यावेळी उपविभागीय कार्यालयाच्या बाहेर निर्मलाताई म्हात्रे, हेमराज मात्रे, मल्लिनाथ गायकवाड, मोहन गायकवाड आणि भाई आर सी घरत यांची घणाघाती भाषणे झाली. मुळात 2015 साली सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देऊन कथित भ्रष्टाचाराची कुठलीही शक्यता नसल्याचे नोंदविले आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारची प्रत्येक आघाडीवर अधोगती होत आहे.सध्या आपला देश धार्मिक तेढ पसरविणाऱ्या शक्तीमुळे सलोख्यापासून दूर जात आहे.

महागाई, बेरोजगारी, बिघडणारे आर्थिक स्थैर्य, राष्ट्रीय उपक्रमांची होत असलेली सर्रास विक्री, बारगळलेल्या स्मार्ट सिटी सारख्या योजना, भारतीय चलनाचे सातत्याने होत असलेले अवमूल्यन, मंदावलेला विकास दर अशा गोष्टींवर ज्या ज्या व्यक्ती किंवा जे जे पक्ष बोलतात त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी केंद्रीय यंत्रणांचा अतिरेकी वापर करून त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न करत आहे.

नुकतीच भारतीय काँग्रेस पक्षाने देशभरात मंथन शिबिरे घेऊन भारतीय जनता पार्टी च्या निष्क्रिय कारभाराची पोलखोल केली. ज्या ज्या आघाड्यांवर भारतीय जनता पार्टीचे सरकार निष्प्रभ ठरत आहे त्या सगळ्या गोष्टी नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली आहे. याच सगळ्यामुळे धास्तावलेल्या भारतीय जनता पार्टीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाठीमागे सक्तवसुली संचालनालयाच्या मध्यामातून अस्तंगत झालेल्या केसचे कुभांड मागे लावले आहे. राहुल गांधी हे संघर्ष योद्धा असल्याकारणामुळे विजिगिषू वृत्तीने या साऱ्या चौकशीला सामोरे जात आहेत. परंतु केंद्रातील सरकारने अवलंबलेल्या या वृत्तीचा निषेध देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.

पनवेल उपविभागीय कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे आपला निषेध नोंदविला.

या आंदोलनात पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भाई आर सी घरत, सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, युथ काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे, अनुसूचित जाती व जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन गायकवाड, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनंत सुदाम पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष वैभव पाटील, पनवेल शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक लतीफ शेख, कार्याध्यक्ष डॉक्टर अमित दवे, पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, खांदा कॉलनी ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयवंत देशमुख, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष आदम दलाईत, पर्यावरण सेलचे अध्यक्ष एड.कुंभार, ब्लॉक कांग्रेस कमेटी अध्यक्ष आरती ठाकूर, उपाध्यक्ष अनुपमा सिंग, पूजा मोहन, सायरा पुनी, सोनिया चोहाता, अंजुन तेरवा, रेश्मा खान, वत्सलाबाई सोनावणे, ललिता सोनावणे आदी मान्यवरांच्या सहकार्य करते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.